कोरोनाच्या पार्श्‍वभूमीवर परीक्षा काळावधीत विविध उपाययोजना करण्याची मागणी

Published by
अहमदनगर लाईव्ह 24

अहमदनगर Live24 टीम, 01 मार्च 2021:- एप्रिल व मे मध्ये होणार्‍या शिक्षण मंडळाच्या लेखी परीक्षेच्या पार्श्‍वभूमीवर कोरोनाच्या वाढत्या संक्रमणापासून बचाव करण्यासाठी विविध उपाययोजनांची अंमलबजावणी करण्याच्या मागणीचे निवेदन महाराष्ट्र राज्य शिक्षक परिषदेच्या वतीने राज्य अध्यक्ष वेणुनाथ कडू, शिक्षक आमदार तथा कार्याध्यक्ष नागो गाणार,

राज्य महिला आघाडी प्रमुख पूजाताई चौधरी, राज्य सरकार्यवाह नरेंद्र वातकर यांनी शालेय शिक्षण मंत्री वर्षाताई गायकवाड यांच्यासह शिक्षण विभागाच्या संबंधीत अधिकार्‍यांना पाठविण्यात आले असल्याची माहिती शिक्षक परिषदेचे नेते बाबासाहेब बोडखे यांनी दिली.

शिक्षण विभागाने घोषित केलेल्या लेखी परीक्षा वेळापत्रकानुसार उच्च माध्यमिक प्रमाणपत्र परीक्षा व उच्च माध्यमिक व्यवसाय अभ्यासक्रम परीक्षा शुक्रवार दि. 23 एप्रिल ते शुक्रवार दि. 21 मे 2021 या कालावधीत घेण्यात येणार आहे. तसेच माध्यमिक शाळांत प्रमाणपत्र परीक्षा गुरुवार दि. 29 एप्रिल ते गुरुवार दि. 20 मे 2021 या कालावधीत होणार असल्याचे घोषित करण्यात आले आहे.

सध्या महाराष्ट्रात कोरोनाने पुन्हा डोके वर काढले असून, त्याचे संक्रमण वाढत आहे. या परीक्षा कालावधीत कोरोनाच्या संक्रमणापासून विद्यार्थ्यांचे संरक्षण करण्यासाठी नियोजन करण्याची गरज असल्याचे शिक्षक परिषदेच्या वतीने स्पष्ट करण्यात आले आहे.

प्रत्येक शाळेला परीक्षा केंद्र (होमसेंटर) घोषित करण्यात यावे, कोरोना संक्रमणापासून संरक्षण करण्यासाठी आवश्यक त्या भौतिक सोयी, सवलती उपलब्ध करून द्याव्या, प्रत्येक परीक्षा केंद्रात फिजिकल डिस्टन्सचे बंधन काटेकोरपणे पाळले जाईल याची दक्षता घेण्यात यावी,

विद्यापीठाच्या नियोजनाप्रमाणे ऑनलाईन व ऑफलाईन परीक्षेची व्यवस्था करून विद्यार्थ्यांना विकल्प निवडण्याची संधी देण्यात यावी, प्रत्येक विषयात उत्तीर्ण होण्यासाठी किमान 25 टक्के गुण बंधनकारक करावे, उत्तरपत्रिका तपासणीचे काम तालुकास्तरावर केंद्रीय पद्धतीने करावे, तसेच विद्यार्थी शिक्षक व शिक्षकेतर कर्मचार्‍यांच्या आरोग्याच्या दृष्टिकोनाने उपरोक्त नियोजन व्यवस्था करण्याची मागणी निवेदनाद्वारे करण्यात आली आहे.

  • ब्रेकिंग बातम्यांसाठी आमचे टेलिग्राम चॅनेल जॉइन करा http://bit.ly/3qvXmDb
  • अहमदनगर Live24 च्या ब्रेकिंग बातम्या मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर|
अहमदनगर लाईव्ह 24

Published by
अहमदनगर लाईव्ह 24