अहमदनगर Live24 टीम, 22 जून 2021 :- डॉक्टर असल्याचे भासवून कोरोना रुग्णावर उपचार केल्याने रुग्णाच्या मृत्यूस कारणीभूत ठरलेल्या केडगाव मधील वादग्रस्त हॉस्पिटल मधील सदर व्यक्तीवर गुन्हा दाखल करण्याची मागणी रुग्णाचे नातेवाईक आसिर अमीन सय्यद यांनी पोलीस अधीक्षक कार्यालयात निवेदनाद्वारे केली आहे.
आसिर सय्यद यांचे दाजी वजीर हुसेन शेख यांना 15 एप्रिल रोजी कोरोनाची लागण झाल्याने त्यांना केडगाव येथील रेणुकामाता मल्टीस्पेशालिटी हॉस्पिटल मध्ये दाखल करण्यात आले. हॉस्पिटल मधील इसम संदीप वाळुंज यांनी डॉक्टर असल्याचे भासवून हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आलेल्या रुग्णावर (दाजी) उपचार सुरू केले.
हॉस्पिटल मधील ऑक्सिजन संपला असता त्यांना बाहेरून स्वखर्चाने ऑक्सिजनचे सिलेंडर खरेदी करून आणून देण्यात आले.
परंतु दुर्दैवाने त्यांचा 28 एप्रिल रोजी सदर हॉस्पिटलमध्ये निधन झाले. नुकतेच या हॉस्पिटल विरोधात हॉस्पिटलला परवानगी नाही, एमडी डॉक्टर रुग्णांना न तपासता संदीप वाळुंज हॉस्पिटलमध्ये रुग्ण तपासत असल्याबाबत तक्रार केल्याचे वृत्त वाचले.
या वृत्ताने संपुर्ण कुटुंबीयांना धक्का बसला. याप्रकरणी चौकशी केली असता संदीप वाळूंज डॉक्टर नसून एमआर असल्याचे समजले. याप्रकरणी अधिक चौकशी केली असता तेथे चहा-नाश्ता देणारे बालचंद्र साळवे यांची भेट घेतली.
साळवे यांनी हॉस्पिटलमध्ये चहा, नाश्ता देण्यासाठी कामावर होतो. कधी कधी काही रुग्णांना काही त्रास झाल्यास रुग्णांची देखभाल करुन त्यांना औषधे देखील दिल्याचे आंम्हाला सांगितले.
वाळुंज हा साळवे यांना देखील रुग्णांच्या नातेवाईकांना डॉक्टर असल्याचा भासवायचा. आरोग्य कर्मचारी औटी संबंधित एमआर असलेल्या वाळुंजच्या परिचयाचा होता. तो त्याच्या ऑफिसमध्ये येऊन बसत असे.
कधीकधी कॅश काउंटरला ही बसत असे. सर्व लक्षात आल्या कारणाने मी तेथे जाणे बंद केले. तुमच्या दाजींच्या मृत्यूस मी जबाबदार नसून, तुम्ही संबंधित असलेल्या सीसीटीव्ही फुटेज तपासण्याचे साळवे यांनी सांगितले असल्याचे सय्यद यांनी निवेदनात म्हंटले आहे.
सदर हॉस्पिटलचे सर्व सीसीटीव्ही फुटेज ताब्यात घ्यावे, साक्षीदार म्हणून हॉस्पिटलमध्ये चहा, नाष्टा देणारे साळवे यांचा जबाब घ्यावा,
डॉक्टर असल्याचे भासवून कोरोना रुग्णांवर उपचार केल्याने रुग्ण दगावला असताना मृत्यूस कारणीभूत ठरलेल्या सदर एमआरवर सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करुन, त्याला अटक करण्याची मागणी रुग्णाचे नातेवाईक सय्यद यांनी केली आहे.