अल्पवयीन मुलीस पळवून नेणार्‍याचा शोध घेण्याची मागणी !

Published by
अहमदनगर लाईव्ह 24

अहमदनगर Live24 टीम, 26 ऑगस्ट 2021 :- पंधरा वर्षीय अल्पवयीन मुलीस फुस लावून पळवून नेल्याप्रकरणी नऊ दिवस उलटूनही पोलिसांकडून तपास होत नसल्याने रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया (गवई गट) व मुलीच्या आई-वडिलांनी मुलीचा शोध घेण्याची मागणी करण्यात आली.

यावेळी आरपीआयचे शहर जिल्हाध्यक्ष सुशांत म्हस्के,शहर कार्याध्यक्ष दानिश शेख, अल्पसंख्याक प्रवक्ता जमीर इनामदार, शहराध्यक्ष नईम शेख, संतोष पाडळे, युवक जिल्हाध्यक्ष पवन भिंगारदिवे, विजय शिरसाठ, मीना शिरसाठ आदी उपस्थित होते.

चांदा (ता. नेवासा) येथील एका अल्पवयीन मुलीचे राहत्या घरातून अज्ञात व्यक्तीने दि.14 ऑगस्ट रोजी पळवून नेले आहे. सदर प्रकरणी सोनई पोलीस स्टेशनमध्ये दि.15 ऑगस्ट रोजी अज्ञात व्यक्ती विरोधात कलम 363 प्रमाणे फुस लावून पळवून नेल्याप्रकरणी गुन्हा दाखल झाला आहे.

मुलगी अल्पवयीन असल्याने आई-वडील पोलिसांकडे तिचा तपास लागण्यासाठी विचारपूस करत आहे. मात्र पोलीस सदर प्रकरण गांभीर्याने घेत नसून, मुलीच्या आई-वडिलांना उडवाउडवीची उत्तरे दिली जात आहे. सदर कुटुंबीय मागासवर्गीय असल्याने तपास अधिकारी यांच्याकडून त्यांना हिनतेची वागणुक मिळत आहे.

सदर प्रकरणी अधिक विचारपूस केल्यास तुमची मुलगी, तुम्ही शोधा! असे सांगून पोलीस स्टेशनमधून त्यांना पिटाळून लावण्याचा प्रकार घडला आहे. ज्या मुलावर संशय आहे, त्याचे नांव सांगून देखील तपास होत नसल्याचा आरोप आरपीआयच्या वतीने करण्यात आला आहे.

या प्रकरणी तपास लागण्यासाठी मुलीच्या आई-वडिलांनी दि.20 ऑगस्ट रोजी पोलीस अधीक्षकांची भेट घेऊन निवेदन दिले होते. तरी देखील मुलीचा शोध घेण्यासाठी तपास करण्यात आलेला नाही. जिल्ह्यात अल्पवयीन मुली व महिलांवर अत्याचाराच्या घटना घडत असताना, लवकरात लवकर सदर मुलीचा तपास लागणे आवश्यक आहे.

पोलिस प्रशासनाचा धाक राहिलेला नसल्याने अशा घटना घडत असल्याचे निवेदनात म्हंटले आहे. नऊ दिवसात सदर प्रकरणी मुलीचा शोध घेण्यासाठी पोलीसांनी तपास न केल्यास आरपीआयच्या वतीने मुलींच्या कुटुबीयांसह आमरण उपोषण करण्याचा इशारा देण्यात आला आहे.

अहमदनगर लाईव्ह 24

Published by
अहमदनगर लाईव्ह 24