शीलाविहारला लॅण्ड माफियाने बंद केलेला रस्ता खुला करुन देण्याची मागणी

Published by
अहमदनगर लाईव्ह 24

अहमदनगर Live24 टीम, 24 जून 2021 :- गुलमोहर रोड, शीलाविहार येथे लॅण्ड माफियाने जागा बळकाविण्यासाठी नागरिकांच्या वहिवाटीचा 20 फुटी रस्ता बंद केला असताना,

सदर जागेतून गेलेली पिण्याची पाईपलाइन देखील तोडून दहशत निर्माण केल्याचा आरोप स्थानिक नागरिकांनी केला आहे.

मागीक वर्षापासून वहिवाटीचा रस्ता खुला करुन देण्याची मागणी केली जात असताना नागरिकांनी मनपा आयुक्तांना स्मरणपत्र देऊन रस्ता खुला करुन देण्याची मागणी केली आहे. तर कोणत्याही रहिवाशीची परवानगी नसताना बिल्डरच्या हितासाठी प्लॉटची विभागणी करण्यास स्थानिक नागरिकांनी विरोध दर्शविला आहे.

काही वर्षापुर्वी गुलमोहर रोड येथील शीलाविहार जागेचे प्रकरण चांगले गाजले होते. या भागात शीलाविहार हाऊसिंग सोसायटी बिल्डिंग क्रमांक चार मध्ये 35 वर्षापासून नागरिक वास्तव्यास आहे. या ठिकाणी अनधिकृतपणे 20 फुटी वहिवाटीचा रस्ता होता.

लॅण्ड माफियाने हा वहिवाटीचा रस्त्यावर अनाधिकृतपणे तारेचे कुंपन घालून जागा बळकाविण्याच्या हेतूने बंद केले आहे. हा रस्ता वहिवाटीचा असून, तो प्लॅनमध्ये दाखविण्यात आलेला आहे. मागील तीन-चार वर्षापासून सदर रस्त्यावर अतिक्रमण करण्यात आलेले आहे.

मागील एक वर्षापासून महापालिकेकडे पाठपुरावा सुरू आहे. घराच्या मागे असलेल्या टॉयलेट आणि किचन मधून प्रवेश करण्याची वेळ नागरिकांवर आली असल्याचे स्पष्ट करण्यात आले आहे. बिल्डरने बळकावलेली सदर रस्त्याची दोन ते अडीच हजार स्के. फिट असलेली जागेची बाजारभावाप्रमाणे 65 लाख रुपये किंमत निघते.

रस्ता बळकावण्यासाठी पिण्याची पाईपलाइन देखील तोडून नागरिकांना त्रास देण्याचा प्रकार सुरु आहे. सदर प्लॉटची विभागणी करण्यासाठी स्थानिकांची परवानगी न घेता ती करण्यात आलेली आहे.

त्याची कच्ची नोंद करण्यात आलेली असून, याला सर्वांचा विरोध असल्याचे रहिवाशिंनी निवेदनात नमुद केले आहे. जागा बळकाविण्यासाठी नागरिकांच्या वहिवाटीचा बंद करण्यात आलेला 20 फुटी रस्ता खुला करुन द्यावा, फोडण्यात आलेली पिण्याची पाईपलाइन दुरुस्त करण्याची मागणी स्थानिक नागरिकांनी केली आहे.

निवेदनावर तिरथलाल अरोरा, विशाल अरोरा, अजित रसाळ, विवेक बल्लाळ, किरण बल्लाळ, सकिना निसळ, सोनिया लाला, सुधीर गोर्डे यांच्या स्वाक्षर्‍या आहेत.

अहमदनगर लाईव्ह 24

Published by
अहमदनगर लाईव्ह 24