अहमदनगर Live24 टीम, 12 मार्च 2021:- अहमदनगर ते पुणे शटल रेल्वे सेवा सुरु होण्याच्या मागणीसाठी शनिवार दि.13 मार्च रोजी पुकारण्यात आलेल्या रेल्वे रोको आंदोलनात सहभागी होण्याचा इशारा देत, हरदिन मॉर्निंग ग्रुपच्या वतीने सदर शटल रेल्वे सुरु करण्याच्या मागणीचे निवेदन अहमदनगर रेल्वे स्टेशन येथे प्रभारी स्टेशन मॅनेजर श्रीकांत परेडा यांना देण्यात आले.
यावेळी हरदिन मॉर्निंग ग्रुपचे संस्थापक अध्यक्ष संजय सपकाळ, रमेश त्रिमुखे, रमेश वराडे, अभिजीत सपकाळ, दिलीप ठोकळ मेजर, दिपक बडदे, राकेश वाडेकर, विनोद खोत मेजर, रतनकुमार मेहेत्रे, सुरज काळे, अशोक लोंढे आदी उपस्थित होते. अहमदनगर-पुणे रस्त्यावर सातत्याने वाढत असलेल्या वाहतुकीमुळे वाहतुकीची कोंडी आणि अपघात होत आहेत. त्यामुळे पुणे-नगर प्रवासाचा वेळ वाढून तो चार तासांहून अधिक झाला आहे.
सध्या हा मार्ग चौपदरी आहे, मात्र तो कमी पडत आहे. त्यामुळे सध्याच्या रेल्वे मार्गावरच अहमदनगर-पुणे थेट रेल्वे सेवा सुरू केल्यास इंधनाची बचत तर होणार आहेच, पण विद्यार्थी, ज्येष्ठ नागरिक, महिला व नोकरदार वर्गाला यामुळे सुरक्षित प्रवास करता येणे शक्य होणार आहे.
मोठ्या प्रमाणात प्रवाश्यांचा नगर-पुणे प्रवास सुरु आहे. ही रेल्वे सेवा सुरु झाल्यास दोन्ही शहराच्या दृष्टीने सोयीचे होऊन रेल्वे विभागाला देखील आर्थिक उत्पन्न मिळणार आहे. मागील 11 वर्षांपासून तत्कालीन रेल मंत्री मा. सुरेश प्रभू, मागील टर्म मध्ये मा.ना. पियुष गोयल, मध्य रेल्वेचे जनरल मॅनेजर, सोलापूर विभागाचे रेल्वे मॅनेजर अशा अनेक लोकांनी आश्वासन दिले, त्यात विद्युतीकरण संपल्यावर, ततपश्चात कॉडलाईनचे काम झाल्यावर आणि मागील वर्षी दौंड येथे बाय पास येथे रेल्वे स्थानक झाल्यावर इंटरसिटी रेल्वे सेवा सुरू करण्याचे आश्वासन देण्यात आले होते.
मात्र हे आश्वासन पाळले गेले नाही. सदर रेल्वे सेवा सुरु होण्यासाठी खासदार डॉ. सुजय विखे पाटील, आमदार संग्राम जगताप व माजी खासदार दिलीप गांधी यांचा पाठपुरावा सुरु आहे. अहमदनगर ते पुणे शटल रेल्वे सेवा सुरु होण्याकरिता केंद्र सरकारसह रेल्वे विभागाचे लक्ष वेधण्यासाठी अहमदनगर जिल्हा प्रवासी संघटनेने पुढाकार घेऊन शनिवार दि.13 मार्च रोजी रेल्वे रोको आंदोलन करण्याचा इशारा दिला आहे.
यामध्ये हरदिन मॉर्निंग ग्रुप व इतर स्वयंसेवी संघटना, राजकीय पक्ष, सामाजिक कार्यकर्ते व नागरिक सहभागी होणार असल्याचे निवेदनात म्हंटले आहे. तसेच सदर मागणीसाठी भिंगार ज्येष्ठ नागरिक मंचच्या वतीने देखील निवेदन देण्यात आले.