अहमदनगर Live24 टीम, 16 जुलै 2021 :- महात्मा फुले कृषी विद्यापीठ व शासनाचे चुकीचे धोरणामुळे बीएस्सी अॅग्रीसाठी प्रवेश नाकारल्याने नेवासे तालुक्यातील दिघी येथील यज्ञेश संजय नागोडे या विद्यार्थ्याने नेवासा तहसील समोर उपोषण करण्याचा ईशारा दिलेल्या निवेदनात दिला आहे.
सदरचे निवेदन संजय नागोडे यांनी तहसीलदार कार्यालयात दिले. भेंडे येथील जिजामाता कृषी महाविद्यालयात तीन वर्षांचा डिप्लोमा पूर्ण केला असून कृषी पदविका प्राप्त केलेल्या विद्यार्थ्यांला सलग दुसऱ्या वर्षात प्रवेश मिळतो.
मात्र, या वेळी नियम बदल करून डिग्रीसाठी प्रवेश नाकारला जात असून यास राहुरी येथील महात्मा फुले कृषी विद्यापीठ व शासनाचे चुकीचे धोरण कारणीभूत असल्याचे निवेदनात स्पष्ट केले. सर्व कृषी पदविका करणारे विद्यार्थी यामुळे नैराश्यात गेले आहेत.
या संदर्भात सर्व विद्यार्थी कृषिमंत्री, कृषी विद्यापीठासह विधानभवनात देखील गेलो तेथे म्हणणे मांडण्याचा प्रयत्न केला. पण काहीही उपयोग झाला नाही. बीएसस्सी अॅग्रीला प्रवेश मिळाला नाही, तर विद्यार्थी बरोबर सर्व कुटुंबाचे ही नुकसान होणार आहे.
राज्य शासनाने याबाबत योग्य निर्णय घेऊन विद्यार्थ्यांना नैराश्यातून बाहेर काढावे व योग्य तो न्याय द्यावा अन्यथा, उपोषणाला बसू, असा इशारा देण्यात आला.
निवेदनाच्या प्रती मुख्यमंत्री, कृषिमंत्री, मंत्री शंकरराव गडाख जिल्हाधिकारी यांना पाठवण्यात आल्या आहे. विद्यार्थी यज्ञेश यांचे वडील संजय नागोडे यांनी निवेदन तहसीलदार कार्यालयात दिले.