अहमदनगर Live24 टीम, 19 ऑगस्ट 2021 :- यंदा कांदा आवक कमी होऊनही बाजारभाव वाढताना दिसत नाही. त्यामुळे शेतक-यांमध्ये नाराजी निर्माण झाली आहे. जिल्ह्यातील नेवासा कृषी उत्पन्न बाजार समितीच्या घोडेगाव कांदा मार्केटमध्ये बुधवारी झालेल्या कांद्याच्या लिलावात कांद्याला सर्वात जास्त म्हणजे २२०० रुपये भाव मिळाला.
तर नगर येथील नेप्ती उपबाजार समितीत एक नंबर कांद्याला २००० रुपये भाव मिळाला. घोडेगाव येथे ६७ हजार ५२५ गोण्या इतकी आवक झाली होती तर नगर मध्ये ४५ हजार ३२८ गोण्याची अवाक झाली होती.
नगरला एक नंबर कांद्याला २००० हजार, दोन नंबर १५५०,तीन नंबर १०५० असा भाव मिळाला. दरम्यान कांदा बाजारासाठी राज्यात प्रसिद्ध असलेल्या पारनेर कृषी उत्पन्न बाजार समितीत खरेदी केलेला कांदा थेट मुंबई, बेंगलोर व दिल्लीसह देशातील विविध राज्यात व मोठ्या शहरातही पाठविला जातो.
मात्र या बाजार समितीत फक्त नऊ हजार कांदा गोण्याची आवक झाली. एक नंबर कांद्यास दोन हजार रूपये प्रति क्विंटल असे भाव मिळाला. सध्या तालुक्यात अद्यापही मोठ्या प्रमाणात जुना कांदा शिल्लक आहे.
तसेच नवीन कांदाही बाजारात येऊ लागला आहे. मात्र यंदा पाऊस अतिशय कमी प्रमाणात तर काही भागात झालाच नसल्याने नवीन कांद्याचे उत्पादन अतिशय कमी आहे. त्यामुळे नवीन कांदा बाजारात फारसा येणार नाही.
ही शक्यात शेतकऱ्यांनी गृहीत धरली आहे. भविष्यात कांद्याचा तुटवडा निर्माण होईल अन् बाजारभाव वाढतील या अशेवर शेतकऱ्यांनी आपला कांदा साठवून ठेवला आहे. अनेकदा ऑक्टोबर-नोव्हेंबरच्या दरम्यान कांदा बाजारभाव मोठ्या प्रमाणात वाढतात. त्यामुळे शेतकरी साठवलेला कांदा बाजारभाव वाढल्याशिवाय बाजारात आणत नाहीत.