अहमदनगर Live24 टीम, 20 मार्च 2021:- शॉर्टसर्किटमुळे श्रीरामपूर तालुक्यातील शिरसगाव येथे चार एकर ऊस जळून खाक झाला आहे. ही घटना शुक्रवारी साडे अकरा वाजेच्या सुमारास घडली.या घटनेत एकूण सात लाख रुपयांचे नुकसान झाले आहे.
याबाबत सविस्तर असे की, रतनबाई अप्पासाहेब मुद्गुले, गणेश अप्पासाहेब मुद्गुले, सुरेश अप्पासाहेब मुद्गुले यांच्या मालकीच्या शिरसगाव हद्दीतील गट क्रमांक १३ मधील उसाला सकाळी ११.३० वाजेदरम्यान विजेच्या शॉर्टसर्किटमुळे आग लागली.
आग लागल्याचे लक्षात येताच आग विझविण्यासाठी अशोक सहकारी साखर कारखाना व श्रीरामपूर नगरपालिकेकडून आलेल्या अग्निशामक दलाच्या जवानांनी ही आग आटोक्यात आणण्यासाठी शर्थीचे प्रयत्न केले; परंतु उन्हाळा व वाऱ्यामुळे लागलेली आग पसरत गेली व शेवटी चार एकर ऊस जळून खाक झाला.
यात चार एकर उसाचे ५ लाख रुपये व ठिबक सिंचनचे २ लाख असे एकूण सात लाख रुपयांचे नुकसान झाले. शिरसगावच्या तलाठ्यांनी पंचनामा केला. महावितरणचे अधिकारी व वायरमन यांनीही घटनास्थळी तातडीने भेट दिली. उन्हाळ्यात नेहमी विजेच्या शॉर्टसर्किटमुळे आगी लागत असतात.
महावितरणच्या हलगर्जीपणामुळे ग्रामीण भागात विजेच्या तारा खाली लोंबकळत असतात. वाऱ्याने त्या एकमेकांना घासून आग लागण्याच्या घटना घडतात, त्यामुळे महावितरणने सर्व तारा ताणून घ्याव्यात, म्हणजे अशा घटनांना आळा बसेल.
तारा ताणून न घेतल्यास या भागातील शेतकरी व नागरीक महावितरण कंपनीच्या विरोधात आंदोलन करणार असल्याचा इशारा या भागातील शेतकऱ्यांनी दिला असून नुकसानग्रस्तांना तातडीने नुकसानभरपाई द्यावी, अशी मागणी त्यांनी केली आहे.