आगीत सोन्याचे दुकान खाक

Published by
अहमदनगर लाईव्ह 24

अहमदनगर Live24 टीम, 13 मार्च 2021:- कोपरगाव शहरातील छत्रपती शिवाजी महाराज रोडवरील मंगलयोग अलंकार ज्वेलर्स या सराफाच्या दुकानाला शुक्रवारी रात्री ८ वाजेच्या सुमारास भीषण आग लागली.

या आगीत दुकानातील सर्व सामान जाळून खाक झाले. आग शॉर्टसर्किटमुळे लागल्याचा प्राथमिक अंदाज व्यक्त केला जातोय.

कोपरगाव शहरातील सराफ बाजार येथील योगेश व मंगेश दत्तात्रय निकुंभ या सराफ बंधूंच्या मालकीचे हे दुकान आहे. योगेश निकुंभ दुकान बंद करून घरी गेले असता काही वेळाने ही आग लागली.

नागरिकांनी जवळील बोअरवेलच्या पाण्याने आग विझवली. या घटनेची माहिती कोपरगाव शहर पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक वासुदेव देसले यांना मिळताच ते व त्यांचे सहकारी क्षणाचा विलंब न करता घटनास्थळी दाखल झाले.

ही आग विझविण्याकरिता पालिकेच्या अग्निशामक दलालादेखील पाचारण करण्यात आले; मात्र या मार्गावर असलेल्या अडथळ्यांमुळे अग्निशामक येण्यास विलंब झाला.

उष्णतेने दुकानावरील पत्रे, दुकानातील साहित्य गरम झाल्याने ते थंड करण्याचे कार्य अग्निशामक दलाने केले. या घटनेत सुदैवाने कुठलीही जीवितहानी झाली नाही.

या घटनेबाबत कोपरगाव शहर पोलीस स्टेशनला तक्रार दाखल करण्यात आली नव्हती. त्यामुळे नेमके किती नुकसान झाले, याची माहिती मिळू शकली नाही.

  • ब्रेकींग बातम्यांसाठी आमचे टेलिग्राम चॅनेल जॉइन करा http://bit.ly/3qvXmDb
  • अहमदनगर Live24 च्या ब्रेकिंग बातम्या मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर|
अहमदनगर लाईव्ह 24

Published by
अहमदनगर लाईव्ह 24