अहमदनगर Live24 टीम, 28 जून 2021 :- विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी राजकीय संन्यासाबाबत केलेल्या वक्तव्याची जोरदार चर्चा होत आहे. सोशल मीडियावरही यावरून चर्चा सुरू असून, सत्ताधारी पक्षातून प्रतिक्रिया उमटू लागल्या आहेत.
शिवसेनेचे नेते खासदार संजय राऊत यांनी फडणवीसांच्या वक्तव्यावर भूमिका मांडल्यानंतर काँग्रेसचे नेते आणि राज्याचे महसूल मंत्री बाळासाहेब थोरात यांनी फडणवीसांच्या घोषणेचा शेलक्या शब्दात समाचार घेतला.
“सत्तेसाठी काहीही बोलायचं, नंतर कृती करायची नाही; हा भाजपाचा पहिल्यापासूनचा प्रयत्न आहे. जनमाणसाला फसवणं आणि सत्ता मिळवणं हा उद्देश ठेवून ते अशी वक्तव्य करतात,” अशी टीका थोरात यांनी केली.
काही वर्षापूर्वी ते स्वतंत्र विदर्भ होत नाही तोपर्यंत लग्न करणार नाही,असे म्हणाले होते. त्याचे काय झाले?, मंत्रिमंडळाच्या पहिल्या बैठकीत धनगर आरक्षणाचा प्रश्न सोडवू म्हणाले होते. त्यानंतर आता ओबीसी आरक्षण दिले नाही तर संन्यास घेईन म्हणत आहेत,
मात्र यापैकी काहीच झाले नाही, असे बाळासाहेब थोरात म्हणाले. “सत्तेसाठी काहीही बोलायचं, नंतर कृती करायची नाही, हा भाजपचा पहिल्यापासूनचा प्रयत्न आहे. जनमाणसाला फसवणं आणि सत्ता मिळवणं हा उद्देश ठेवून ते अशी वक्तव्य करतात.
स्वतंत्र विदर्भ होत नाही तोपर्यंत लग्न करणार नाही, असं देवेंद्र फडणवीस म्हणाले होते. मात्र त्यानंतर काय झालं आपण सर्वांनी पाहिलं. त्यामुळे देवेंद्र फडणवीस यांच्या घोषणा गांभीर्याने घेण्याची गरज नाही,” अशी टीकाही थोरात यांनी केली.