अहमदनगर Live24 टीम, 22 मे 2021 :- दुसऱ्यांदा झालेल्या लॉकडाऊनमुळे कलेचे उपासक सर्व कलाकार अडचणीत आहेत.
यासाठी सेठ माधवलाल धूत व रामनाथ धूत चॅरिटेबल ट्रस्ट या दोन्ही ट्रस्टच्यावतीने सामाजिक दायित्व जपत प्रसिद्ध कलाकार पवन नाईक यांच्या प्रयत्नातून अन्नपूर्णा योजने अंतर्गत आर्थिक अडचणीतील सुमारे चारशे कलाकारांना किराणा कीट देवून छोटीशी मदत केली आहे.
अशी माहिती संस्थेच्या जेष्ठ सदस्या प्रतिभा धूत यांनी दिली. नगरच्या माधवलाल धूत व रामनाथ धूत चॅरिटेबल ट्रस्ट या दोन्ही सामजिक ट्रस्टच्या विश्वस्तांच्या वतीने जीवन कला प्रकल्प म्हणून जिल्ह्यातील कलाकारांसाठी अन्नपूर्णा योजना राबवून चारशे कलाकारांना किराणा मालाचे कीट श्रीगोपाल धूत व प्रतिभा धूत यांच्या हस्ते दिले.
श्रीगोपाल धूत म्हणाले, गेल्या चौदा महिन्यांपासून असलेल्या कोरोना काळात कलाकारांची फार मोठी वित्तीय हानी झाली.
मनोरंजन व आत्मरंजन क्षेत्राशी निगडित शास्त्रीय, सुगम, ऑर्केस्ट्रा, नाट्य, दूरचित्रावणी मालिका, निवेदन व ध्वनी व्यवस्थापन क्षेत्रातील कलाकार आर्थिक अडचणीत आहेत.
त्यांना कर्तव्याच्या भावनेतून परिवाराच्या गरजेनुसार एक ते तीन महिने पुरेल असे गहू, तांदूळ, डाळ व तेल असलेले धान्याचे कीट दिले आहे.