अहमदनगर Live24 टीम, 2 जुलै 2021 :- मनपा शिक्षण मंडळाचे प्रशासनाधिकारी सुहास पवार व पर्यवेक्षक जुबेर पठाण यांनी कल्याण रोड येथील श्री लक्ष्मीनारायण शिशु शिक्षण मंदिर संचलित संस्कृती श्रीनिवास कनोरे प्रशालेस भेट देऊन शालेय कामकाजाची पाहणी केली.
याप्रसंगी शालेय समितीचे चेअरमन जितेंद्र लांडगे, विश्वस्त कृष्णा बागडे, मुख्याध्यापिका श्रीमती कल्पना भामरे आदि उपस्थित होते. याप्रसंगी प्रशासनाधिकारी सुहास पवार म्हणाले, आज कोरोनामुळे शाळेत विद्यार्थी येत नसले
तरी विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान होऊ नये यासाठी शिक्षकांनी प्रयत्न करणे आवश्यक आहे. ऑनलाईनच्या माध्यमातून त्यांनी विद्यार्थ्यांचे शिक्षण सुरु ठेवावे. यानिमित्त पालकांशीही कायम सुसंवाद साधता येत असल्याने विद्यार्थ्यांच्या प्रगतीत भर पडेल.
शासनाच्यावतीने त्याबाबत मार्गदर्शक सूचना येत असून, त्याचे पालन व्हावे. एक नविन माध्यम म्हणून डिजिटल शिक्षणाकडे पाहिले पाहिजे. ऑनलाईन शिक्षणाद्वारे विद्यार्थ्यांना नवनवीन गोष्टी शिकण्यास मिळत आहे.
संस्कृती श्रीनिवास कनोरे प्रशालेचे कामकाज चांगल्यापद्धतीने सुरु असल्याबद्दल समाधान व्यक्त केले. याप्रसंगी चेअरमन जितेंद्र लांडगे यांनी शाळेच्यावतीने सुरु असलेल्या विविध उपक्रमांची माहिती दिली.
विद्यार्थी व पालकांच्या अडचणी समजून घेऊन त्यांना मदतही करण्यात येत आहे. प्रत्यक्षात शाळाजरी सुरु नसली तरी विद्यार्थ्यांना व्यवस्थीत शिक्षण मिळावे यासाठी प्रयत्नशिल असल्याचे सांगितले.
यावेळी मुख्याध्यापिका श्रीमती कल्पना भामरे म्हणाल्या, कोरोनामुळे शाळा बंद असल्यातरी विद्यार्थ्यांना ऑनलाईन शिक्षणाद्वारे गेल्या वर्षभरापासून अभ्यासक्रम पूर्ण करुन घेण्यात आला आहे. आताही नवीन शैक्षणिक वर्ष सुरु झाले असून,
विद्यार्थ्यांनाही ऑनलाईन शिक्षणाची गोडी लागली आहे. ज्या विद्यार्थ्यांना अडचणी असतील त्या सोडविण्यासाठी प्रयत्न केले जात आहेत. गृहभेटीद्वारेही विद्यार्थी व पालकांना मार्गदर्शन केले जात असल्याचे त्यांनी सांगितले.
याप्रसंगी प्रशासनाधिकारी सुहास पवार व पर्यवेक्षक जुबेर पठाण यांचा चेअरमन जितेंद्र लांडगे यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला. याप्रसंगी शिक्षकवृंद व कर्मचारी उपस्थित होते.