अहमदनगर Live24 टीम, 28 मार्च 2021:- नागवडे कारखान्याची वार्षिक सर्वसाधारण सभा ऑनलाइन घेण्यात आली. या सभेला कारखाना प्रशासनाने आजी-माजी सभासदांना, आमदारांना निमंत्रण देणे गरजेचे असताना मर्जीतील ठरावीक लोकांनाच सभेची ऑनलाइन लिंक पाठवत झालेल्या बैठकीत घाणेरडे राजकारण पहावयास मिळाले.
आगामी नागवडे कारखाना निवडणुकीत केशव मगर, अण्णासाहेब शेलार यांच्या बरोबर राहणार असल्याचे राष्ट्रवादीचे घनश्याम शेलार यांनी पत्रकार परिषदेत सांगितले.
यावेळी कारखान्याचे उपाध्यक्ष केशव मगर, अण्णासाहेब शेलार, जिजाबापू शिंदे उपस्थित होते. घनश्याम शेलार म्हणाले, नवीन ५००० टन प्रकल्पाची मंजुरी घेण्यासाठी ही सभा घेतली. या प्रकल्पास किती खर्च येणार हे सभासदांना सांगितले पाहिजे.
कारखान्यावर कर्ज असताना नवीन प्रकल्प करायला संचालक मंडळाची मान्यता नसून या प्रकल्पाला सर्वांचा विरोध आहे. याबाबत आपण तक्रार करणार आहोत. कारखान्यात मनमानी कारभार होऊ देणार नाही, असे शेलार यांनी सांगितले.
नागवडे कारखाना निवडणूक बिनविरोध व्हावी, अशी आमची इच्छा आहे. पण खासगी कारखाण्याच्या मालकास नागवडे कारखान्याचे अध्यक्षपद देण्यास आमचा विरोध असल्याचे अण्णासाहेब शेलार यांनी सांगितले.