अहमदनगर Live24 टीम, 3 ऑगस्ट 2021 :- डाळिंबाचे क्षेत्र तेल्या रोगाच्या कचाट्यात सापडले आहे. कोरोनाच्या संकटात भरातभर म्हणून आणखी एक मोठे आर्थिक संकट बळीराजासमोर येऊन उभे ठाकले आहे.
डोळ्यादेखील फळबागाचे नुकसान होत असल्याने बळीराजा हवालदिल झाला आहे. डाळिंब रोगाच्या जाळ्यात सापडल्याने नाईलाजाने शेतकर्यांसमोर हि सर्व फळबाग जेसीबी घालून नष्ट करण्याची वेळ ओढवली आली आहे. नगर तालुक्यात जवळपास तीन हजार हेक्टर क्षेत्रावर डाळिंबाची लागवड झालेली आहे.
बाजारी मागणी चांगली असल्याने दुष्काळी भागातील शेतकरी मोठा आर्थिक भार सोसत डाळिंब लागवडीकडे वळला. शेतकऱ्यांनी आर्थिक धाडस करीत डाळिंब पिकांची लागवड केली. यातून तालुक्यात डाळिंब बाग लागवड तीन हजार हेक्टरपर्यंत पोहोचली. मात्र, सध्याच्या विपरीत हवामान व वातावरणाचा परिणाम या डाळिंब फळबागांवर होत आहे.
यातून तेल्या रोगाचा मोठ्या प्रमाणात प्रादुर्भाव वाढला आहे. त्यामुळे फळांच्या उत्पादनावर थेट विपरीत परिणाम होत असल्याने तालुक्यातील जवळपास ८o टक्के डाळिंबांचे क्षेत्र जेसीबीच्या साहाय्याने काढून टाकण्याची वेळ शेतकऱ्यांवर आली आहे.
वातावरणातील अतिआर्द्रता व रासायनिक खतांचा वाढता वापर यामुळे ही परिस्थिती ओढावल्याचे जाणकार शेतकरी सांगतात. सततच्या रासायनिक खतांच्या डोसामुळे बागामधील उष्णतेचे प्रमाण वाढते. यामुळे बागांवर तेल्या रोगाचा प्रादुर्भाव वाढण्याचा धोका अधिकच वाढला आहे.