अहमदनगर Live24 टीम, 22 फेब्रुवारी 2021:-राज्यासह जिल्ह्यात कोरोनाचा प्रादुर्भाव वाढू लागला आहे. यामुळे पुन्हा एकदा भीतीदायक वातावरण निर्माण झाले आहे. यातच राज्यातील अनेक ठिकाणी लॉकडाऊन देखील करण्यात आले आहे. तर काही ठिकाणी संचारबंदी लावलण्यात आली आहे.
नागरिकांनी नियमांची अमलबजावणी करावी यासाठी प्रशासनाने हालचाली सुरु केल्या आहेत. याच अनुशंगाने पारनेर तालूक्यात एका ठिकाणी कारवाई करण्यात आली आहे. पारनेर तालुक्यांमध्ये करोनाच्या पार्श्वभूमिवर मंगल कार्यालय मालकांना नियमाचे पालन करण्याच्या सूचना देण्यात आल्या होत्या.
त्याअनुषंगाने तहसिलदार ज्योती देवरे यांनी मंगल कार्यालयाची पाहणी केली. दोन मंगल कार्यालयावर शासनाच्या नियमापेक्षा जास्त गर्दी आढळून आल्यामुळे दंडात्मक कारवाई त्यांनी केली आहे. पारनेर येथील लक्ष्मी नारायण मंगल कार्यालय व मनकर्णिका मंगल कार्यालय यांच्यावर दंडात्मक कारवाई केली आहे.
तसेच या पुढील काळामध्ये लग्न समारंभामध्ये जास्तीची उपस्थिती राहिल्यास दंडात्मक तसेच फौजदारी कारवाई करण्यात येण्याचा इशारा देवरे यांनी दिला आहे. तहसिलदार यांच्या पथकाने पहाणी केली तेंव्हा मंगल कार्यालयमध्ये ४०० लोकांची उपस्थिती होती. तसेच अनेकांनी मास्क लावलेले नव्हते.
तसेच काही कार्यालय मालकांनी सांगितले की, आम्ही टप्याटप्प्याने लोकांना सोडत आहे. मात्र या ठिकाणी कोणत्याही प्रकारचे नियमाचे पालन होत नव्हते. तसेच शासन नियमाप्रमाणे ५० पेक्षा जास्त व्यक्तींना लग्न समारंभात उपस्थित राहण्याचा आदेश नाही. त्यामुळे अशा प्रकारचा कोणताही युक्तीवाद ऐकून घेण्यात येणार नाही, असे तहसिलदार ज्योती देवरे यांनी सांगितले.
पारनेर शहरात सार्वजनिक ठिकाणी मास्क न लावल्यामुळे कारवाई करण्यात आली आहे. मंगल कार्यालय व सार्वजनिक ठिकाणी मास्क न लावणार्या व्यक्तींवर कारवाई करण्यात आली आहे. त्यांच्याकडून जवळपास 50 हजार रुपयांचा दंड वसूल करण्यात आला आहे. तहसिलदार यांनी केलेल्या कारवाईमध्ये पोलिस निरीक्षक घनश्याम बळप हे देखील आपल्या पथकासह उपस्थित होते.