अहमदनगर Live24 टीम, 11 सप्टेंबर 2021 :- गरजू घटकातील विद्यार्थ्यांना आधार देण्याचे कार्य करणार्या रोटरी क्लब ऑफ अहमदनगर इंटिग्रिटीच्या वतीने केडगावच्या ओंकारनगर येथील महापालिका प्राथमिक शाळेतील विद्यार्थ्यांना स्कूलशूज व बालमित्र या पुस्तकाचे वाटप करण्यात आले.
यावेळी रोटरी इंटिग्रिटीचे अध्यक्ष सुयोग झंवर, सचिव हेमंत लोहगांवकर, माजी समाजकल्याण अधिकारी रफिक मुन्शी, रोटरी मिडटाऊनचे माजी अध्यक्ष क्षितीज झावरे, लिटरसीचे संचालक किशोर डोंगरे, शाळेचे मुख्याध्यापक भाऊसाहेब कबाडी, सहशिक्षक शिवराज वाघमारे, सहशिक्षिका वृषाली गावडे आदींसह पालक व विद्यार्थी उपस्थित होते.
सुयोग झंवर म्हणाले की, आजचे विद्यार्थी हे उद्याच्या सक्षम भारताचे भविष्य आहे. सर्व घटकातील विद्यार्थ्यांना शिक्षणाच्या सोयी-सुविधा मिळण्यासाठी रोटरी इंटिग्रिटी योगदान देत आहे. क्लबच्या माध्यमातून अनेक शाळेतील गरजू विद्यार्थ्यांना मदत देण्याचे कार्य सातत्याने सुरु आहे.
लवकरच शाळा सुरु होण्याच्या मार्गावर असून, महापालिकेच्या शाळेतील विद्यार्थ्यांना स्कुलशूज व पुस्तकाचे वाटप करण्यात आल्याचे त्यांनी सांगितले. क्षितीज झावरे यांनी विद्यार्थ्यांना ध्येय निश्चित करुन ते साध्य करण्यासाठी उच्च शिक्षण घेण्याचे आवाहन केले. तर तुमच्या पाठिशी रोटरीचे पाठबळ कायम असल्याचा विश्वास दिला.
मुख्याध्यापक भाऊसाहेब कबाडी यांनी प्रास्ताविकात रोटरी इंटिग्रिटी सारख्या सामाजिक संस्थांच्या पाठबळामुळे सर्वसामान्य घटकातील विद्यार्थ्यांना प्रोत्साहन मिळत आहे, रोटरीचे शैक्षणिक कार्यात असलेले योगदान कौतुकास्पद असल्याचे त्यांनी सांगितले.
रफिक मुन्शी यांनी महापालिकेची शाळा असून देखील शाळेची स्वच्छता व टापटिपणामुळे शाळेला आयएसओ मानांकन मिळणे हे भुषणावह बाब आहे, महापालिकेच्या शाळेतील शिक्षक गुणसंपन्न विद्यार्थी घडविण्यासाठी देत असलेल्या योगदानाबद्दल त्यांचे कौतुक केले. हेमंत लोहगावकर यांनी उपस्थितांचे आभार मानले.