जिल्हा बँक: चार जागांसाठी शनिवारी मतदान

Published by
अहमदनगर लाईव्ह 24

अहमदनगर Live24 टीम, 18 फेब्रुवारी 2021:-अहमदनगर जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या संचालक मंडळाची निवडणूकप प्रक्रीया सुरु आहे. बँकेच्या २१ पैकी १७ जागा बिनविरोध झाल्याने उर्वरीत चार जागांसाठी शनिवार दि. २० फेब्रुवारी रोजी सकाळी ८ ते दुपारी ४ वाजेपर्यंत मतदान होणार आहे.

जिल्हयात प्रत्येक तालुक्याच्या ठिकाणी एक याप्रमाणे चौदा मतदान केंद्रातील १७ बुथवर मतदान प्रक्रियेचे काटेकोर नियोजन करण्यात आले असून मतदान केंद्रात मोबाईल नेण्यास मनाई करण्यात आली आहे. राज्य सहकारी निवडणूक प्राधिकरणाच्या मान्यतेसह बँकेच्या निवडणूकीचा कार्यक्रम निवडणूक निर्णय अधिकारी दिग्विजय आहेर यांच्या नियंत्रणात प्रत्यक्षात सुरु आहे.

उमेदवारी दाखल करण्याच्या अंतिम मुदतीपर्यंत जिल्हा बॅंकेच्या संचालक पदासाठी विक्रमी उमेदवारी अर्ज दाखल झाले होते. उमेदवारी दाखल करण्याच्या अंतिम मुदतीतच राहाता व शेवगांव सेवा सोसायटी मतदारसंघात अन्य कोणी नामांकन पत्र दाखल केल्याने माजी मंत्री आण्णासाहेब म्हस्के व माजी आमदार चंद्रशेखर घुले पाटील बिनविरोध निवडल्याचे स्पष्ट झाले.

त्यानंतर पाथर्डी सेवा सोसायटी मतदारसंघातून आमदार मोनिकाताई राजळे व कोपरगावमधून विवेक कोल्हे बिनविरोध निवडले गेले. उमेदवारी माघारीच्या अखेरच्या दिवशी उच्चांकी संख्येने उमेदवारी अर्ज माघारी घेतले गेले. अखेरच्या दिवशी मंत्री शंकरराव गडाख (नेवासा), सिताराम गायकर (अकोले), माधवराव कानवडे (संगमनेर), अरूण तनपुरे (राहुरी),

अमोल राळेभात (जामखेड), माजी आमदार राहुल जगताप (श्रीगोंदा), भानुदास मुरकुटे (श्रीरामपूर ) हे सेवा सोसायटी मतदारसंघातून संचालक म्हणून बिनविरोध निवडले गेले. तसेच शेतीपूरक प्रक्रिया मतदारसंघातून आमदार आशुतोष काळे, अनुसूचित जाती/जमाती मतदारसंघातून अमित अशोक भांगरे,

इतर मागासवर्गीय मतदारसंघातून करण जयंत ससाणे, विमुक्त जाती भटक्या जमातीतून गणपतराव सांगळे आणि महिलांसाठीच्या दोन जागी अनुराधा नागवडे व आशा तापकिर यांची बिनविरोध निवड झाली. आता जिल्हाभरातील १४ मतदान केंद्रातील १७ बुथवर मतदान प्रक्रिया होणार आहे.

नगर, पारनेर व कर्जत येथे सेवा सोसायटी व बिगरशेती संस्थासाठीच्या मतदानासाठी प्रत्येकी दोन बुथ राहाणार आहेत. उर्वरीत मतदान केंद्रावर बिगरशेती संस्थासाठीच्या मतदानासाठी एकच बुथ असणार आहे.

मतदान प्रक्रियेनंतर निवडणूक निर्णय अधिकारी कार्यालयात दुसरे दिवशी रविवारी सकाळी ९ वाजता मतमोजणी प्रक्रिया होणार आहे. निवडणूक निर्णय अधिकारी आहेर यांच्या नियोजनात मतदान व मतमोजणी प्रक्रियेसाठी अधिकारी,कर्मचारी व पोलिस सुरक्षा तैनात केल्याची माहिती सहायक निवडणूक निर्णय अधिकारी हरिश्चंद्र कांबळे व किशन रत्नाळे यांनी दिली.

अहमदनगर लाईव्ह 24