अहमदनगर Live24 टीम, 15 फेब्रुवारी 2021:- राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार हे माझे आदर्श आहेत. जिल्हा बँकेतून अध्यक्ष म्हणून काम करण्याची संधी मला उपमुख्यमंत्री अजित पवार, मधुकर पिचड यांनी दिली. भाऊसाहेब हांडे यांनी ३४ वर्षे जिल्हा बँक संचालक म्हणून काम केल्यानंतर आता मी थांबून घेतो, यानंतर सीताराम गायकर बँकेचा संचालक होईल, असे जाहीर केले होते.
आज माझे ७१ वर्षे वय असल्याने पंच्याहत्तरवी साजरी करून मीही बँक संचालक म्हणून थांबून घेईन. मी पुन्हा जिल्हा बँक निवडणूक लढवणार नाही. यानंतर नवीन कार्यकर्त्यांस जिल्हा बँक संचालक म्हणून काम करण्याची संधी देऊ, असे प्रतिपादन जिल्हा बँकेचे अध्यक्ष व पुन्हा बिनविरोध संचालक म्हणून निवडून आलेले सीताराम गायकर यांनी केले. गायकर म्हणाले, माझ्या आजवरच्या राजकीय व सामाजिक जीवनात वेगवेगळ्या संस्थेतून विविध पदांवर काम करण्याची संधी मिळाली.
या वाटचालीत ज्येष्ठ नेते अजित पवार, माजी मंत्री मधुकरराव पिचड यांचे मोठे योगदान राहीले. गेल्या ४० वर्षांत तालुक्यातील जनतेने व सर्वपक्षीय कार्यकर्त्यांनी माझ्यावर विश्वासाने खूप प्रेम केले. गायकर म्हणाले, जिल्हा बँकेतून ३४ वर्षे संचालक व अध्यक्ष राहीलेले स्वर्गीय भाऊसाहेब हांडे यांच्या नेतृत्वाखाली मी कार्यकर्ता म्हणून कामास सुरुवात केली. सेवा सोसायटीत अध्यक्ष व सेल्समन, अमृतसागर दूध संघाचे संचालक व १५ वर्षे अध्यक्ष म्हणून काम केले. अकोले तालुका एज्युकेशन सोसायटीचे अध्यक्ष व विश्वस्त तसेच महानंद दूध महासंघाचा संचालक म्हणून काम करीत आहे.
अगस्ती कारखान्याचा उपाध्यक्ष व जिल्हा बँकेत सलग २३ वर्षे संचालक असतानाच ६ वर्षे अध्यक्ष म्हणून काम करण्याची संधी मिळाली. अगस्ती कारखान्याला मदत करताना जिल्ह्यातील सर्वच साखर कारखान्याना मदत करता आली. शेतकऱ्यांना ० टक्के व्याजदराने ३ लाख रुपयांपर्यंतचे कर्ज देण्याचा निर्णय घेतला, असे गायकर यांनी सांगितले.