अहमदनगर Live24 टीम, 27 ऑगस्ट 2021 :- पोलीस अधिकाऱ्यांसमोर आरोग्य कर्मचाऱ्याला मारहाण होते. आरोग्य अधिकाऱ्यांना शिवीगाळ केली जाते. वरिष्ठ अधिकारी तहसीलदारांना म्हणतात, आमदारांचे ऐका नाही तर ऍट्रासिटीचा गुन्हा दाखल होईल.
या लोकांना पैसा, सत्ता अन् पोलीस यंत्रणेचा माज चढला आहे. आमचं काहीही होऊ शकत नाही, अशी हवा त्यांच्या डोक्यात शिरली आहे. हे उधळलेले सत्तेचे बैल असून, त्यांना वेसण घालावी लागणार आहे, अशी टीका भारतीय जनता पक्षाच्या महिला आघाडीच्या प्रदेश उपाध्यक्ष चित्रा वाघ यांनी केली.
पारनेरच्या तहसीलदार ज्योती देवरे यांची ऑडिओ क्लिप व्हायरल झाल्यानंतर देवरे आणि लंके यांचे एकमेकांवर आरोपप्रत्यारोप सुरू झाले. भाजप नेत्या चित्रा वाघ यांनी पारनेर येथे तहसीलदार देवरे यांची भेट घेतली. त्यानंतर त्यांनी जिल्हाधिकाऱ्यांचीही भेट घेतली. भाजप कार्यालयात पत्रकारांशी संवाद साधला.
त्या म्हणाल्या, पारनेर तहसीलदारांना लोकप्रतिनिधी आणि प्रशासकीय यंत्रणा यांच्याकडून त्रास दिला जात आहे. त्याचा कुठेतरी उद्रेक होऊन ऑडिओ क्लिप संपूर्ण महाराषट्रात व्हायरल झाली. अफगाणिस्तापेक्षा वेगळी परिस्थिती आपल्याकडे आहे का? असा सवाल उपस्थित करून त्या म्हणाल्या, आम्ही जिजाऊ, रामाई, सावित्रीच्या लेकी आहोत.
हे शब्द फक्त भाषणात घेण्यापुरते उरले आहेत. आमदार नीलेश लंके यांनी 4 ऑगस्ट रोजी लसीकरणाचे टोकण वाटप करणाऱ्या लिपिकाला मारहाण व शिवीगाळ केली. वैद्यकीय महिला अधिकारी आणि कर्मचाऱ्यांना शिवीगाळ केली, असा दावा करत ही शिवीगाळ कोणत्या अधिकाराने केली, असा सवाल चित्रा वाघ यांनी उपस्थित केला.
महिला सशक्तीकरण, सक्षमीरणाच्या नावाने भोंब मारणार पक्ष त्या आमदार एका शब्दाने विचारत नाही. महिलांची आई-बहीण काढायची, तिला वेश्या म्हणायचे हा अधिकार यांना कोणी दिला, याचे सत्ताधाऱ्यांनी जनतेला उत्तर द्यावे. प्रांताधिकारी सांगतात मॅडम तुम्ही लोकप्रतिनिधीचे ऐकून वागा नाही तर तुमच्यावर ऍट्रासिटीचा गुन्हा दाखल होईल.
ही गंभीर बाब आहे. प्रशासकीय अधिकाऱ्यांनी तहसीलदारांच्या पाठिशी उभे राहणे आवश्यक होते. पण, ते तहसीलदारांच्या पाठिशी उभे राहण्याऐवजी त्यांच्या दबाव आणित आहेत. याच दाखल घ्यावी सरकारला वाटले नाही हे दुर्दैव आहे, अशी टीकाही त्यांनी केली.