Big News:वीज बिलात बचत करण्यासाठी सौर ऊर्जेचा वापर वाढत आहे. अनेकांनी घरावर, कार्यालयांवर, कंपनीत, हॉस्पिलमध्ये सोलर प्रकल्प बसविले आहेत.
त्यामुळे सध्या त्यांचे काम सोपे आणि कमी खर्चिक झाले आहे. आता मात्र त्यांची चिंता वाढविणारी बातमी आळी आहे. हवामान बदलामुळे विविध राज्यांच्या सौर आणि पवन ऊर्जा क्षमतेवर नजिकच्या भविष्यात परिणाम होऊ शकतो असा निष्कर्ष पुण्यातील भारतीय उष्ण-कटिबंधीय हवामान शास्त्र संस्थेच्या संशोधकांनी एका अभ्यासाद्वारे काढला आहे.
पाच दशकांमध्ये सौर विकिरण १० ते १५ टक्क्यांनी कमी होईल, तर याच कालावधीत पवन ऊर्जा क्षमता मात्र वाढू शकते असे या अभ्यासात आढळून आले आहे.
मान्सूनच्या आधी आणि नंतरच्या महिन्यांतही एकंदर ढगांच्या आच्छादनात वाढ झाल्यामुळे ही घट होऊ शकते, त्यामुळे हा फटका बसण्याचा अंदाज आहे.
या अभ्यासानुसार मोसमी आणि वार्षिक वाऱ्यांचा वेग उत्तर भारतात कमी होण्याची आणि दक्षिण भारतात वाढण्याची शक्यता आहे.
यामुळे भविष्यात महाराष्ट्रातील पवन ऊर्जा क्षमता वाढू शकते. येत्या काही वर्षांत मान्सूनचे महिने अधिक वाऱ्यांचे आणि ढगाळ राहण्याचा अंदाज वर्तवण्यात आला आहे.
संस्थेचे टीएस आनंद, दीपा गोपालकृष्णन् आणि पार्थसारथी मुखोपाध्याय यांनी हे संशोधन केले आहे. शास्त्रज्ञांनी म्हटले आहे की, पश्चिम भारतावरील सौर विकिरण सर्व ऋतूंमध्ये कमी होऊ शकतं त्यामुळे सौर ऊर्जा उत्पादनावर परिणाम होण्याची शक्यता आहे.
मान्सूनच्या आधी आणि नंतरच्या महिन्यांतही एकंदर ढगांच्या आच्छादनात वाढ झाल्यामुळे ही घट होऊ शकते. मान्सूनचे महिने अधिक वादळी राहण्याचा अंदाज आहे.
पवन ऊर्जेच्या बाबतीत, मध्य भारतात, प्रामुख्याने महाराष्ट्र, मध्य प्रदेश आणि छत्तीसगडमध्ये, बहुतांश हवामानात सकारात्मक कल दिसून येतो, असेही त्यात म्हटले आहे.