अहमदनगर Live24 टीम, 16 नोव्हेंबर 2021 :- अहमदनगर जिल्हा रुग्णालयात झालेल्या दुर्घटनेनंतर राज्यातील सर्वच सरकारी रुग्णालयातील आग सुरक्षा यंत्रणेबाबत प्रश्नचिन्ह उपस्थित झाले आहे.
दरम्यान नगर जिल्हा रुग्णालयातील अतिदक्षता विभागाला लागलेल्या आगीनंतर डॉक्टर, परिचारिकांंनी सुरू केलेले काम बंद आंदोलन सोमवारी सहाव्या दिवशीही सुरूच होते.
जिल्हा रुग्णालयातील करोना अतिदक्षता विभागाला 6 नोव्हेंंबर रोजी आग लागून 11 जणांचा मृत्यू झाला. यानंतर सरकारने चौकशी समिती नियुक्त केली. या समितीकडून अद्याप चौकशी सुरू आहे.
दुसरीकडे पोलिसांनी गुन्हा दाखल करून तपास सुरू केला. अतिदक्षता विभागातील मिळालेल्या सीसीटीव्ही फुटेजचा आधार घेत पोलिसांनी एक वैद्यकीय अधिकारी व तीन परिचारिकांना दोषी धरून त्यांना गुन्ह्यात वर्ग करून घेतले.
यामुळे जिल्हा रुग्णालयातील डॉक्टर, कर्मचारी आक्रमक झाले आहेत. सुरूवातीला त्यांनी या घटनेचा निषेध व्यक्त करून झालेली कारवाई चुकीची असल्याचे म्हटले होते. यानंतर त्यांनी बुधवारपासून काम बंद आंदोलन सुरू केले आहे.
तसेच जिल्हा रुग्णालयात आग सुरक्षा यंत्रणा बसविण्यात याव्यात, जोपर्यंत आग सुरक्षा यंत्रणा बसविण्यात येत नाही तोपर्यंत होणार्या दुर्घटनेस डॉक्टर, परिचारिका, कर्मचार्यांना जबाबदार धरण्यात येऊ नये,
असे लेखी आश्वासन जोपर्यंत मिळत नाही, तोपर्यंत काम बंद आंदोलन सुरूच राहणार असल्याचे महाराष्ट्र आरोग्य सेवा परिचारिका संघटनेच्या राज्य अध्यक्षा सुरेखा आंधळे यांनी सांगितले.