लस घेतल्यानंतर कोरोनाचा प्रादुर्भाव खरच कमी होतो ?

Published by
अहमदनगर लाईव्ह 24

अहमदनगर Live24 टीम, 24 मे 2021 :- कोरोना प्रतिबंधक लस किती प्रभावी आहे? याचा शोध घेण्यासाठी आता भारतीय आयुर्विज्ञान संशोधन परिषदेकडून (आयसीएमआर) माहिती गोळा करण्यात येत आहे.

आयसीएमआरने या संबंधी राज्यांकडून माहिती मागवली आहे. कोरोनावरील लस घेतल्यानंतर किती नागरिकांना रुग्णालयात दाखल करावे लागले? याची आकडेवारी सर्व राज्ये आणि केंद्र शासित प्रदेशांनी तयार ठेवावी, असे आयसीएमआरने सांगितले आहे.

लस घेतल्यानंतर कोरोनाचा प्रादुर्भाव खरच कमी होतोय का? यासाठी ही माहिती घेतली जात असल्याचे तज्ज्ञांनी सांगितले.

राज्यांमध्ये आतापर्यंत किती जणांनी लस घेतली आहे? किती जण अॅक्टिव्ह आहेत? तसेच उपचारासंबंधी प्रोटोकॉल आणि कोरोना संसर्ग रुग्ण हॉस्पिटलमध्ये दाखल असण्याचा कालावधीसंबंधी माहिती आयसीएमआरने मागितली आहे.

तसेच आरोग्यासंबंधीच्या पायाभूत सुविधांवर किती ताण पडत आहे? याचीही माहितीही घेतली जाणार आहे. ऑक्सफोर्ड-अॅस्ट्राझेनका अथवा फायजर लशींचे दोन डोस कोरोनाच्या बी.1.617.2 व्हेरिएंटवर 80 टक्के प्रभावी असल्याचा निष्कर्ष ब्रिटिश सरकारच्या अध्ययनात समोर आला आहे.

या लशींचे दोन डोस 87 टक्के सुरक्षा प्रदान करते असे यात नमूद करण्यात आले आहे. कोरोनामुक्त झालेल्या व्यक्तींच्या शरीरात अँटीबॉडीज तयार होतात.

कोरोनावर मात केलेल्या 96 टक्के रुग्णांच्या शरीरात एका वर्षानंतरही अँटिबॉडीज कायम असतात, अशी माहिती जपानच्या योकोहामा सिटी विद्यापीठाने केलेल्या संशोधनातून समोर आली आहे. कोरोनाची लागण झालेल्या जवळपास 250 व्यक्तींच्या शारिरीक स्थितीची चाचणी संशोधनादरम्यान करण्यात आली.

संशोधनात सहभागी झालेल्या 250 जणांमध्ये 21 ते 78 वर्षे वयाच्या व्यक्तींचा समावेश होता. कोरोनाची जास्त लक्षणे आढळून आलेल्या व्यक्तींच्या शरीरात एक वर्ष अँटिबॉडी कायम होत्या.

तर कोरोनाची कमी आणि अजिबात लक्षणे नसलेल्या 97 टक्के व्यक्तींच्या शरीरात सहा महिन्यांपर्यंत अँटिबॉडी कायम राहिल्याचे संशोधनातून समोर आले.

अहमदनगर लाईव्ह 24