अहमदनगर Live24 टीम, 22 जुलै 2021 :- राहुरी तालुक्यातील गुहा परिसरातील नागरिकांचे जगणे भटक्या कुत्र्यांमुळे मुश्कील झाले आहे. पूर्वी कुत्रे चावले की गावठी औषधांवर भर दिला जायचा.
कुत्र्याचे चावणे ही साधी बाब नसून वेळीच उपचार न घेतल्यास जीवावरही बेतू शकते, हे ध्यानात आल्यानंतर हल्ली कुत्रे चावले म्हंटले की उपचार घ्यायचेच अशी मानसिकता झाली आहे.
मात्र आता कुत्रा चावल्यावर आवश्यक असलेली रेबीज लसच उपलब्ध होत नसल्याने नागरिक वैतागले आहे. राहुरी तालुक्यातील गुहा येथे पिसाळलेल्या कुत्र्याने धुमाकूळ घातला आहे. या कुत्र्याने सात ते आठ ग्रामस्थांना चावा घेतला आहे. त्यामुळे ग्रामस्थांमध्ये सध्या भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे.
कुत्र्याने चावा घेतल्यानंतर इंजेक्शन घेण्यासाठी रुग्णांसह नातेवाइकांची चांगलीच धावपळ उडाली. गुहा प्राथमिक आरोग्य केंद्रात गेल्यानंतर येथे रेबीज लस उपलब्ध नाही. ही लस तालुक्यात कुठेच उपलब्ध नसून त्यासाठी नगर येथील जिल्हा रुग्णालयात जावे लागेल.
सिव्हिल हॉस्पिटलमध्ये लस घेऊन रुग्णांनी सुटकेचा निश्वास सोडला. कुत्रे चावले तर उपचार हवेतच कुत्रे कोणतेही असो ते चावले आणि त्याची लाळ रक्तात मिसळली की “रेबीज’ चा धोका निर्माण होता.
हेच रुग्णाच्या जीवावर बेतू शकते त्यामुळे जखमेभोवती इंजेक्शन आवश्यक आहे. जे इंजेक्शन तालुक्यात उपलब्ध करून देण्यात यावे अशी मागणी नागरिकांनी केली आहे.