अहमदनगर Live24 टीम, 10 फेब्रुवारी 2021:-श्रीगोंदा तालुक्यातील टाकळी कडेवळीत माळरानावर कुत्र्यांनी मृतदेह उकरून काढल्याचे रहिवाशांच्या लक्षात आले. त्यांनी पोलिस निरीक्षक रामराव ढिकले यांना ही माहिती दिली.
खून करून पुरावा नष्ट करण्याच्या उद्देशाने मृतदेह पुरला असल्याची प्राथमिक शक्यता पोलिस सूत्रांनी व्यक्त केली. अतिरिक्त पोलिस अधीक्षक सौरभ अग्रवाल यांनी मंगळवारी घटनास्थळी भेट दिली.
पुरुषाचा मुंडके नसलेला मृतदेह कुत्र्यांनी उकरून काढला. घटनेची माहिती मिळताच तहसीलदार प्रदीप पवार, पोलिस निरीक्षक रामराव ढिकले, तालुका आरोग्य अधिकारी डॉ. नितीन खामकर, डॉ. संघर्ष राजुळे घटनास्थळी आले.
मृताच्या अंगात निळा शर्ट व राखाडी रंगाची पॅँट आहे. या व्यक्तीची ओळख पटवण्याचे काम सुरू आहे. मृतदेह येथेच खून करून पुरला का, दुसरीकडे खून केल्यानंतर मृतदेह येथे पुरला, अशी चर्चा आहे. मृतदेहाचे मुंडके शोधण्यात येत आहे.