कोल्हापूर : भाजप (Bjp) प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील (Chandrakant Patil) यांनी गृहमंत्री पदावरून ठाकरे सरकारचा चांगलाच समाचार घेतला आहे. तसेच खासदार संजय राऊत (Sanjay Raut) यांच्यावरही निशाणा साधला आहे.
पाटील म्हणाले, महाविकास आघाडीत (Mahavikas Aghadi) सध्या गृहखात्यावरुन नाराजी असल्याचं बोललं जात आहे. शिवसेनेच्या (Shivsena) नेत्यांकडून वळसे-पाटलांचं नाव न घेता टीका होतेय. तसंच गृहखातं मुख्यमंत्री उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांनी स्वत:कडे घेण्याची मागणीही शिवसेना नेत्यांनी केली आहे.
त्याबाबत विचारलं असता, गृहमंत्री म्हणून वळसे-पाटील लेचेपेचे आहेत. व्यक्ती म्हणून खूप चांगले आहेत. पवार कुटुंबातूनही वळसे-पाटलांचं नाव समोर आणलं. उद्धव ठाकरे यांना सल्ला देण्याची वेळ निघून गेली.
मी सांगितलं होतं की गृहमंत्रीपद तुम्ही राष्ट्रवादीकडे (Ncp) देऊ नका. मी बोललो होतो की, राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष मातोश्रीलाही कॅमेरे लावतील. पण त्यावेळी माझ्या बोलण्यावर हसले होते, असा टोला चंद्रकांत पाटील यांनी शिवसेना आणि राष्ट्रवादीला लगावला आहे.
दरम्यान, मुंबई मेट्रो उद्घाटनाच्या कार्यक्रम पत्रिकेत विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांचं नाव देण्यात आलेलं नाही. त्यामुळे भाजपनं पोस्टरबाजी करत महाविकास आघाडीवर टीका केलीय.
पुणे मेट्रोच्या उदघाटनावेळी आम्ही असं केलं का? या सरकारचं मन मोठं नाही. त्यांना केवळ मोदी नावाची अॅलर्जी आहे. फडणवीसांना कार्यक्रमाला बोलावलं असतं तर चाललं असतं, असंही पाटील यावेळी म्हणाले आहेत.