अहमदनगर Live24 टी म, 22 सप्टेंबर 2021 :- केंद्रीय मनुष्यबळ विकास मंत्रालयाच्या वतीने येऊ घातलेल्या नवीन शैक्षणिक धोरणांमध्ये डॉक्टर कर्मवीर भाऊराव पाटील यांनी शंभर वर्षापूर्वी राबवलेले उपक्रम व सांगितलेल्या विचारांचे प्रतिबिंब दिसून येत
असून कर्मवीरांच्या शैक्षणिक क्षेत्रातील योगदानाची व त्यातून झालेल्या सामाजिक जडणघडणीची दखल घेऊन त्यांना भारतरत्न हा सर्वोच्च किताब देऊन सन्मानित केले पाहिजे अशी आग्रही मागणी स्वामी रामानंद तीर्थ मराठवाडा विद्यापीठाचे माजी कुलगुरू डॉ. पंडित विद्यासागर यांनी केली आहे.
येथील राधाबाई काळे महिला महाविद्यालयात आयोजित १३४ व्या कर्मवीर जयंती सोहळ्याप्रसंगी प्रमुख पाहुणे म्हणून बोलताना व्यक्त केली. महाविद्यालयात हा समारंभ ऑनलाईन पद्धतीने साजरा करण्यात आला. यावेळी अध्यक्षस्थानी रयत शिक्षण संस्थेचे माजी सहसचिव प्राचार्य डॉ. दीनानाथ पाटील हे होते.
यावेळी बोलताना माजी कुलगुरू डॉ. विद्यासागर यांनी सांगितले की, अण्णांनी विद्यार्थ्यांचे हित व गुण पारखून त्यांच्या क्षमता वाढविण्यासाठी सतत प्रयत्न केला. रयत आजही सामाजिक बांधिलकी जोपासण्याचे काम करत आहे.
अध्यक्षस्थानावरून बोलताना प्राचार्य दीनानाथ पाटील यांनी रयत मधील अनेक शाळा महाविद्यालयांना दिलेल्या समाजसुधारकांच्या नावाकडे लक्ष वेधले व रयत अशा विचारांवर कशी वाटचाल करत आहे हे सांगितले.
कार्यक्रमाचे प्रास्ताविक व स्वागत महाविद्यालयाचे प्राचार्य डॉक्टर माधव सरोदे यांनी केले. यावेळी त्यांनी महाविद्यालयाची शैक्षणिक वाटचाल व गुणवत्तेची माहिती देऊन भविष्यात राबविल्या जाणाऱ्या उपक्रमांची माहिती दिली.
यावेळी आमदार आशुतोष काळे यांनी कर्मवीरांच्या बद्दल आदरभाव व्यक्त करून शुभेच्छा संदेश देऊन कार्यक्रमाचे उदघाटन केले. कर्मवीरांचा जन्मदिन हा श्रमप्रतिष्ठा दिन म्हणून साजरा केला जातो.
त्यामुळे कार्यक्रमानंतर महाविद्यालयातील सर्व सेवकांनी श्रमदान केले. याप्रसंगी उपप्राचार्य प्रा. नासिर सय्यद, डॉ. मंजूश्री भागवत यांनी पाहुण्यांचा परिचय करून दिला.
कार्यक्रमाचे आभार उपप्राचार्य प्रा. रामदास बर्वे यांनी मानले. सूत्रसंचालन प्रा. सतीश शिर्के व प्रा. शुभांगी ठुबे यांनी केले. या ऑनलाइन कार्यक्रमास तांत्रिक सहाय्य शारीरिक शिक्षण संचालक प्रा विलास एलके व प्रा. अजय जाधव यांचे लाभले.