डॉक्टर गणेश शेळके आत्महत्या, सदोष मनुष्यवधाचा गुन्हा नोंदवा

Published by
अहमदनगर लाईव्ह 24

अहमदनगर Live24 टीम, 9 जुलै 2021 :- वरिष्ठांच्या जाचाला कंटाळून डॉक्टर गणेश शेळके यांनी आरोग्य केंद्रातच गळफास घेऊन आत्महत्या केल्याची धक्कादायक घटना नुकतीच अहमदनगरमध्ये घडली होती.

आता या प्रकरणी तालुका आरोग्य अधिकारी डॉ भगवान दराडे यांना सक्तीच्या रजेवर पाठवण्यात आलं आहे दरम्यान डॉ. गणेश शेळके यांच्या सुसाईड नोटप्रमाणे संबंधित अधिकाऱ्यांवर मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करण्याची मागणी जन आधार सामाजिक संघटनेच्या वतीने पोलिस अधीक्षक कार्यालयाकडे निवेदनाद्वारे केली, अशी माहिती संघटनेचे अध्यक्ष प्रकाश पोटे यांनी दिली.

राज्य उपाध्यक्ष दीपक गुगळे, सचिव अमित गांधी, शहराध्यक्ष शाहनवाज, तालुकाध्यक्ष सुशील साळवे, अमोल गायकवाड आदी उपस्थित होते. डॉ. गणेश शेळके हे शासकीय आरोग्य उपकेंद्र करंजी येथे अनेक दिवसांपासून कार्यरत होते.

एकीकडे लसीकरण सुरु असतानाच डॉ गणेश शेळके यांनी उपकेंद्रातील आपल्या दालनाचा दरवाजा आतून बंद करुन गळफास घेतला होता. बराचवेळ झाला तरी डॉक्टरांनी दरवाजा उघडला नाही म्हणून कर्मचाऱ्यांनी शेळकेंना आवाज दिला.

तरीही दरवाजा न उघडल्यामुळे कर्मचाऱ्यांनी आरडाओरडा सुरु केला. अखेरीस दरवाजा तोडून आत पाहिले असता डॉ. शेळके यांनी फॅनला गळफास घेतल्याचे दिसून आले.

आपल्या आत्महत्येला तालुका वैद्यकीय अधिकारी, तहसीलदार आणि जिल्हाधिकारी जबाबदार असल्याचे डॉ गणेश शेळके यांनी सुसाईड नोटमध्ये लिहिले होते.

इतकेच नाही तर पगार वेळेवर नाही, अतिरिक्त भार आणि पगार कपात करण्याची धमकी देत असल्याने आत्महत्या करत असल्याचे डॉ. शेळके यांनी लिहिले होते. त्यामुळे अहमदनगर जिल्ह्यात एकाच खळबळ उडाली होती.

अहमदनगर लाईव्ह 24