अहमदनगर Live24 टीम, 11 एप्रिल 2021 :- राज्यभरात कोरोनाचा प्रादुर्भाव मोठ्या प्रमाणात वाढत आहे. कोरोनाला रोखण्यासाठी प्रत्येक रुग्णाचा शोध घेणे गरजेचे आहे, असे आवाहन कोरोना टास्क फोर्सचे अध्यक्ष डॉ. तात्याराव लहाने यांनी केले आहे.
कोरोनाबाबत घ्यावयाच्या खबरदारीबाबत विभागातील शिवसैनिकांना मार्गदर्शन मिळावे व त्यांनी सर्वसामान्य जनतेपर्यंत पोहचवावे यासाठी टास्क फोर्सचे अध्यक्ष डॉ. लहाने यांचे ऑनलाइन मार्गदर्शन आयोजित केले होते.
त्यावेळी त्यांनी शिवसैनिकांना सज्ज राहण्याचे आवाहन केले. डॉ. लहाने म्हणाले, कोरोनाला पायबंद घालण्यासाठी प्रत्येक रुग्णांचा शोध घेणे आवश्यक आहे. त्यांना योग्य औषधोपचार, विलगीकरणाबाबत प्रशासन योग्य खबरदारी घेत आहे.
पण त्यांच्या मदतीसाठी शिवसैनिकांनीही सज्ज रहावे. कोरोनाचा वाढता प्रादुर्भाव पाहता शिवसैनिकांनी कोरोनाबाबत जनजागृती करावी अशा सूचना शिवसेना पक्षप्रमुख-मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी केल्या आहेत.
शिवसैनिकांनी आपल्या विभागातील ज्येष्ठ नागरिक, स्वयंसेवी संस्थांच्या संपर्कात राहून सर्वतोपरी मदत करावी, असे आवाहन युवासेना प्रमुख, शिवसेना नेते व पालकमंत्री आदित्य ठाकरे यांनी केले आहे.
त्याची दखल घेत शिवसेना विभाग क्र. १ च्या वतीने विभागप्रमुख-आमदार विलास पोतनीस यांच्या मार्गदर्शनाखाली वॉर रूम तयार करण्यात आली आहे.