अहमदनगर Live24 टीम, 16 जुलै 2021 :- तालुक्यातील करंजी येथील आरोग्य उपकेंद्रात कर्तव्यावर असलेल्या डॉ. गणेश शेळके यांच्या आत्महत्येची नैतिक जबाबदारी स्वीकारून जिल्ह्याचे पालकमंत्री यांनी आपल्या पदाचा राजीनामा द्यावा तसेच डॉ. शेळके यांना आत्महत्येस प्रवृत्त केल्याप्रकरणी दोषींवर सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करून त्यांची उच्चस्तरीय चौकशी करावी.
या मागणीसाठी पाथर्डी येथील पोलिस ठाण्यासमोर शिव स्मारक समितीचे सदस्य सोमनाथ बोरुडे व आम आदमी पार्टीचे जिल्हा संयोजक किसन आव्हाड यांनी उपोषण केले. या उपोषणकर्त्यांची पोलिस निरीक्षक अरविंद जोंधळे यांनी भेट घेत, तुमच्या भावना वरिष्ठांपर्यंत पाठवल्या आहेत.
याबाबत लवकरच गुन्हा दाखल करण्याचा आदेश येणार असल्याने त्याबाबत गुन्हा दाखल करून कायदेशीर कारवाई करू, असे आश्वासन दिल्यानंतर आंदोलन मागे घेण्यात आले. करंजी आरोग्य उपकेंद्रात सेवेवर असताना समुदाय आरोग्य अधिकारी डॉ. गणेश शेळके यांनी आत्महत्या केल्याची घटना घडली.
ही आत्महत्या वरिष्ठांच्या जाचाला कंटाळून केली असल्याचे घटनास्थळावर प्रथम दर्शनी मिळालेल्या डॉ. शेळके यांच्या सुसाईड नोटमध्ये लिहिले.
दोषींवर सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करून सदर मृत डॉक्टर व त्यांच्या पीडित परिवारास आर्थिक ५० लाख रुपयांची मदत देऊन पत्नीस शासकीय नोकरीत सामावून घ्याावेत
व न्याय द्यावा, अशी मागणी यावेळी सोमनाथ पाटील बोरुडे व किसन आव्हाड यांनी केली. यानंतर पोलिस निरीक्षक अरविंद जोंधळे यांच्या आश्वासनानंतर आंदोलन स्थगित करण्यात आले.