अहमदनगर Live24 टीम, 09 फेब्रुवारी 2021:-नगर-पुणे मार्गावर म्हसणेफाटा येथील गजाननकृपा पेट्रोलियम या पंपावर रात्रीच्या वेळी सरकारी वाहनात झोपलेले मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांचे सचिव सागर मोरे यांच्या वाहनाचा चालक अरूण गौतम भोले यास सोमवारी पहाटे मारहाण करून लुटण्यात आले.
याप्रकरणी सुपे (तालुका पारनेर) पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. मुख्यमंत्री ठाकरे यांचे स्वीय सहायक सागर मोरे यांच्या सरकारी वाहनाचा (एमएच ०३ डीए ७०८१) चालक अरूण गौतम भोले रविवारी सरकारी वाहनासह त्याच्या गावी बीड येथे गेला होता.
तेथील काम आटोपून रात्री तो मुंबईकडे जाण्यासाठी निघाला. उशीर झाल्याने नगर-पुणे मार्गावर म्हसणेफाटा येथील गणेश कृपा पेट्रोलियम या पंपावर गाडी थांबवून भोले रात्री साडेबारा वाजण्याच्या सुमारास झोपला.
पहाटे चार वाजण्याच्या सुमारास तीन चोरटे वाहनाजवळ आले. काचेवर आवाज करून त्यांनी भोले याला उठवले. वाहनातून बाहेर येण्यास भाग पाडून चोरट्यांनी त्याला मारहाण केली.
त्यात तो जखमी झाला. भोले याच्या गळ्यातील चार तोळे वजनाची सोन्याची साखळी व खिशातील ७ हजार २०० रूपये चोरट्यांनी काढून घेतले. तेथून जाताना त्यांनी सरकारी वाहनाची चावीही ताब्यात घेतली.
भोले याला लुटल्यानंतर सुपे परिसरातील दौलत पंपाजवळ त्याच चोरट्यांनी संजय ठकाजी नानोर ( डिग्रस, तालुका राहुरी) या पिकअप चालकास अडवून मारहाण करत त्याच्याजवळील चार हजार रूपये काढून घेतल्याची माहिती मिळाली.