अहमदनगर Live24 टीम, 22 मे 2021 :- कोरोनाचा संसर्ग झाल्याने अकोले तालुक्याचे आमदार डॉ. किरण लहामटे यांना उपचारासाठी मुंबईत ब्रीचकॅन्डी रुग्णालयात दाखल करण्यात आले असून त्यांची प्रकृती ठिक आहे.
काही दिवसपूर्वी कोरोना चाचणी पॉझिटिव्ह आल्याने त्यांना सगमनेर येथील चैतन्य हॉस्पिटलमध्ये उपचारार्थ दाखल करण्यात आले होते.
डॉ. जठार हे त्यांच्यावर उपचार करीत होते. मात्र बुधवारी सकाळी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे सर्वेसर्वा शरदचंद्र पवार यांच्याकडून आमदार डॉ. लहामटे यांच्या तब्यतीची चौकशी करण्यात आली.
यानंतर राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार व आरोग्य मंत्री राजेश टोपे यांनीही तब्येतीची माहिती घेतली. आमदार डॉ.लहामटे यांची तब्बेत स्थिर असली तरी अद्याप ताप कायम असल्याचे डॉक्टरांनी त्यांना सांगितले.
यानंतर जेष्ठ नेते शरद पवार यांच्या आग्रहाखातर उपमुख्यमंत्री अजित पवार व आरोग्य मंत्री राजेश टोपे यांनी आमदार डॉ. लहामटेंना पुढील उपचार मुंबईतील ब्रीचकॅन्डी रुग्णालयात करण्याबाबतचा निर्णय घेतला.
त्यानंतर आ. लहामटे यांना पुढील उपचारार्थ मुंबईतील ब्रीचकॅन्डी रुग्णालयात हलविण्यात आले.त्यांची प्रकृती आता स्थिर आहे. ब्रीचकॅन्डी रुग्णालयातील वरिष्ठ डॉक्टरांच्या मार्गदर्शनाखाली त्यांच्यावर पुढील उपचार सुरू आहेत.