अहमदनगर Live24 टीम, 06 फेब्रुवारी 2021:- राज्यात सध्या सर्वत्र महावितरणच्या धोरणांचा निषेध केला जात आहे. वाढीव वीजबिल, सक्तीची वसुली, यामुळे सर्वसामान्यांसह शेतकऱ्यांमध्ये महावितरण विषयी प्रचंड रोष निर्माण झाला आहे. यातच संगमनेर मध्ये शेतकऱ्यांनी महावितरण प्रशासनाला इशारा दिला आहे.
संगमनेर तालुक्यातील तळेगाव दिघे येथे शेतीसाठी दोन दिवसातून केवळ आठ तासच वीज पुरवठा केला जातो. त्यामुळे पाण्याअभावी शेतातील उभी पिके जळून चालली आहेत. पिकांना पाणी देण्यासाठी शेतकऱ्यांना रात्री अपरात्री शेतास पाणी भरण्यासाठी जावे लागते. त्यामुळे येथील शेतकरी संतप्त झाले आहेत.
दोन दिवसात वीज पुरवठा सुरळीत करावा, अन्यथा सोमवारी (दि. ८) सकाळी ९ वाजता रास्तारोको आंदोलन छेडण्याचा इशारा शेतकऱ्यांनी दिला आहे. याप्रश्नी वीज वितरण कंपनीच्या संगमनेर येथील अधिकाऱ्यांना शेतकऱ्यांनी निवेदन दिले. त्यात म्हटले आहे की, खंडित विजेमुळे शेतकऱ्यांना शेती पिकांना पाणी देणे मुश्कील झाले. वीज येते तेव्हा रात्री अपरात्री शेतकऱ्यांना पिकांना पाणी देण्यासाठी जावे लागते.
पुढील दोन महिन्यात रब्बी हंगामातील पिके काढणीस येणार असून पिकांना पाण्याची आवश्यकता आहे. मात्र विजेअभावी पिकांना पाणी देणे शक्य होत नसल्याने पिके जळून चालली आहेत. त्यामुळे दोन दिवसात वीज वितरण कंपनीच्या अधिकाऱ्यांनी वीज पुरवठा सुरळीत करावा, अन्यथा तळेगाव दिघे चौफुलीवर सोमवारी (दि. ८) रोजी सकाळी ९ वाजता रास्तारोको आंदोलन छेडले जाईल, असा इशारा शेतकऱ्यांनी दिला आहे.