सकारात्मक परिणाम नसल्याने कोरोना उपचारातून ‘हे’ महागडे इंजेक्शन बाद होणार…

Published by
अहमदनगर लाईव्ह 24

अहमदनगर Live24 टीम, 19 मे 2021 :- कोरोना रुग्णांवर रेमडेसिवीर इंजेक्शन काहीही सकारात्मक परिणाम करत असल्याचे कोणतेही पुरावे नाहीत.

त्यामुळे प्लाझ्मा थेरपीबरोबरच आता सर्वात जास्त मागणी होत असलेलं रेमडेसिवीर इंजेक्शनही कोरोना उपचाराच्या यादीतून वगळण्याची शक्यता आहे. दिल्लीतील सर गंगा राम रुग्णालयाचे अध्यक्ष डॉ. डी.एस. राणा यांनी याविषयीचे संकेत दिले आहेत.

डॉ. राणा यांनी ‘एएनआय’ वृत्तसंस्थेशी संवाद साधला. यावेळी त्यांनी ही माहिती दिली. डॉ. राणा म्हणाले, प्लाझ्मा थेरपीमध्ये आपण कोरोनाचा संसर्ग झालेल्या रुग्णाला कोरोनातून बऱ्या झालेल्या रुग्णाच्या शरीरातील अॅण्टीबॉडीज देतो, जेणेकरून त्या अँण्टीबॉडीज विषाणूला संपवतील.

कोरोनाचा संसर्ग झाल्यानंतर शरीरात अॅण्टीबॉडीज तयार होतात. मात्र, प्लाझ्मा दिल्यामुळे रुग्णाच्या तब्येतीमध्ये कोणताही प्रकारची सुधारणा होत असल्याचं दिसून आलेलं नाही. मागच्या एका वर्षापासून आम्ही हे बघत आहोत. त्याचबरोबर प्लाझ्मा सहजपणे उपलब्धही होत नाहीये.

वैज्ञानिक आधारावर प्लाझ्मा थेरपी सुरू करण्यात आली होती, मात्र पुराव्याआधारे ती थाबंवण्यात आली आहे, अशी माहिती डॉ. राणा यांनी दिली. कोरोना रुग्णांवर उपचारासाठी वापरल्या जाणाऱ्या इतर औषधांविषयी बोलायचं झाल्यास, रेमडेसिवीर औषधी कोणत्याही प्रकारे परिणाम करत नाही.

त्यामुळे ते उपचाराच्या यादीतून वगळायला हवे. प्लाझ्मा थेरपी असो की रेमडेसिवीर, कोरोना रुग्णावर उपचारासाठी वापरण्यात येणाऱ्या सर्व प्रकारच्या प्रायोगिक औषधी लवकरच यादीतून वगळल्या जाऊ शकतात.

कारण त्यांच्या वापरामुळे कोरोना रुग्णावर कोणत्याही प्रकारचा सकारात्मक परिणाम होत असल्याचे पुरावे नाहीत. तीनच औषधी परिणामकारक ठरत आहेत. सध्या आम्ही परीक्षण करत आहोत असं डॉ. राणा म्हणाले.

केंद्र सरकारने कोरोना रुग्णांवर केली जाणारी प्लाझ्मा थेरपी उपचार यादीतून वगळण्याचा निर्णय घेतला. त्यानंतर आता रेमडेसिवीर इंजेक्शनही वगळले जाणार असल्याचे संकेत मिळत आहे. कोरोना रुग्णांवर केलेल्या जाणाऱ्या प्लाझ्मा थेरपीविषयी अनेक प्रश्न उपस्थित होऊ लागले होते.

देशातील वैद्यकीय क्षेत्रातील तज्ज्ञांनी आणि तज्ज्ञ डॉक्टरांनी प्लाझ्माच्या अतार्किक वापरामुळे उद्भवणाऱ्या धोक्यांविषयी केंद्राला सर्तक केले होते. त्यानंतर हा निर्णय घेण्यात आला.

अहमदनगर लाईव्ह 24

Published by
अहमदनगर लाईव्ह 24