शिक्षण विभागाच्या योग्य नियोजनामुळे शिष्यवृत्ती परीक्षा सुरळीत पार पडली

Published by
अहमदनगर लाईव्ह 24

अहमदनगर Live24 टीम, 13 ऑगस्ट 2021 :- एकीकडे मुंबईतील शिष्यवृत्ती परीक्षा कोरोनाच्या कारणास्तव एक दिवस आधी रद्द झाली असताना नगर जिल्ह्यात शिक्षण विभागाने केलेल्या योग्य नियोजनामुळे परीक्षा सुरळीत पार पडली. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर गेल्या दीड वर्षांत झालेली ही पहिलीच ॲाफलाइन परीक्षा होती.

कोरोनाचे सर्व नियम पाळून, तसेच उत्तम नियोजनाने शिक्षण विभागाने ही परीक्षा सुरळीत पार पाडली. कोरोनामुळे अनेक वेळा पुढे ढकललेली शिष्यवृत्ती परीक्षा अखेर १२ ऑगस्टला ॲाफलाइन पार पडली. जिल्ह्यात ३६८ केंद्रांवर या परीक्षेचे आयोजन केले होते.

त्यात पाचवीसाठी २२५, तर आठवीच्या शिष्यवृत्तीसाठी १४३ परीक्षा केंद्रांचा समावेश होता. नगर जिल्ह्यातून २०१९ शाळांच्या ४७ हजार ४४ विद्यार्थ्यांनी या परीक्षेत सहभाग घेतला होता.

पाचवीच्या परीक्षेसाठी ३० हजार ९८५ विद्यार्थी प्रविष्ट झाले होते. त्यापैकी पहिल्या पेपरसाठी ३४८१, तर दुसऱ्या पेपरसाठी ३५२१ विद्यार्थी अनुपस्थित होते. आठवीच्या परीक्षेसाठी १६ हजार ९६४ विद्यार्थी प्रविष्ट होते. त्यापैकी पहिल्या पेपरला १७८६, तर दुसऱ्या पेपरला १७९७ विद्यार्थी अनुपस्थित राहिले.

अहमदनगर लाईव्ह 24