अहमदनगर Live24 टीम, 2 सप्टेंबर 2021 :- ठाण्यात महिला अधिकाऱ्यावर फेरीवाल्याने केलेल्या हल्ल्याचा राज्यभर निषेध करण्यात येऊ लागला आहे. याचेच काहीसे पडसाद नगर जिल्ह्यात देखील पडलेले दिसून आले आहे.
ठाणे महापालिकेतील सहाय्यक आयुक्तांवर झालेल्या हल्ल्याच्या निषेधार्थ अहमदनगर महापालिकेचे कामकाज बुधवारी बंद ठेवण्यात आले होते.
कामगार युनियनचे अध्यक्ष अनंत लोखंडे यांनी सकाळी महापालिकेच्या कर्मचाऱ्यांना काम बंद ठेवून बाहेर येण्याचे आवाहन केले. त्यानुसार महापालिकेत काम करणारे कर्मचारी प्रवेशव्दारावर जमले.
अध्यक्ष लोखंडे यांनी ठाणे येथील घटनेची कर्मचाऱ्यांना माहिती दिली. या घटनेच्या निषेधार्थ काम बंद ठेवण्याची सूचना लोखंडे यांनी मांडली. त्यास कर्मचाऱ्यांनी प्रतिसाद दिला.
कर्मचारी काम न करता कार्यालयाबाहेर निघून गेले. महापालिकेची सर्वसाधारण सभा होती. या सभेला मोजकेच कर्मचारी उपस्थित होते. ही सभा संपल्यानंतर कर्मचारी निघून गेले.
आयुक्त शंकर गोरे यांच्यासह उपायुक्त यशवंत डांगे हे कार्यालयात उपस्थित होते. अत्यावश्यक सेवा वगळता अन्य प्रशासकीय कामकाज दिवसभर बंद होते.