अहमदनगर Live24 टीम, 23 जून 2021 :- कोरोनामुळे अनेक दिवस मंदिरे बंद ठेवण्यात आली होती. यातच काही कालावधीनंतर मंदिरे खुली देखील करण्यात आली.
मात्र कोरोनाच्या भीतीने भाविकच येत नसल्याने याचा परिणाम मंदिर परिसरातील व्यावसायिकांवर होतो आहे. यातच देशभर प्रसिद्ध असलेले शनिशिंगणापूर देवस्थान भाविकांविना ओस पडून आहे.
दरम्यान कोरोनामुळे आर्थिक फटका बसलेल्या व्यापाऱ्यांमध्ये काली बाहुली विकणारे व्यावसायिक देखील आहे. शनिशिंगणापुरात काळी बाहुली विकली जाते. सध्याच्या कोरोना स्थितीमुळे काळ्या बाहुल्यावाल्यांचेच डोळे पांढरे व्हायची वेळ आली आहे.
या बाहुलीच्या व्यावसायालाच आता कोरोनाची नजर लागली आहे. भाविकच येत नसल्याने बाहुली विकायची कोणाला असा प्रश्न पडला आहे.
कोरोना स्थितीमुळे येथील मंदीर दीड वर्षांपासून बंद असून पूजेच्या ताटात असलेल्या काळ्या बाहुलीचे उत्पादन करणारे पन्नासहून अधिक व्यावसायिक आर्थिक अडचणीत सापडले आहेत.
काळी बाहुली दरवाज्याला उलटी टांगल्यावर कुणाची नजर लागणार नाही, असे सांगितले जात होते. आता मात्र, या धंद्यालाच नजर लागून व्यावसायिकांवर उपासमारीची वेळ आली आहे. यंत्र, पादुका, नवधान्य, शिक्का, नाल या वस्तूसुध्दा साडेसातीत अडकल्या आहे.
दीड वर्षांपासून शनिदर्शन बंद असल्याने येथील हजारो लहान मोठ्या उद्योगाची वाताहत झाली आहे. परिसर व शिंगणापूर ते शिर्डी मार्गावरील सर्व व्यवसाय बंद पडून त्याचा अर्थकारणावर परिणाम झाला आहे.
ट्रस्टची देणगी व सर्व उत्पन्न बंद असल्याने सुविधा व उपक्रम सुरु ठेवणे अवघड झाले आहे. नियमावली ठरवून मंदीर सुरू करावे, अशी मागणी आता जोर धरू लागली आहे.