‘त्या’ आरोपीच्या मृत्यूमुळे पोलिस सापडले अडचणीत

Published by
अहमदनगर लाईव्ह 24

अहमदनगर Live24 टीम, 22 ऑगस्ट 2021 :- पोलिसांच्या ताब्यात असलेला आरोपी सादिक बिराजदार याचा शुक्रवारी उपचारादरम्यान मृत्यू झाला. स्वातंत्र्यदिनाच्या दिवशी रात्री आठच्या सुमारास पोलिसांची गाडी आडवून त्याच्यावर पाच जणांनी प्राणघातक हल्ला केला होता.

या घटनेची चौकशी सुरू असून संबंधितांवर कारवाई होणार असल्याने भिंगार कॅम्प पोलिस अडचणीत सापडले आहेत. आरोपी सादिकच्या विरोधात पाेक्सोचा गुन्हा दाखल होता.

भिंगार कॅम्प पोलिस ठाण्याचे कर्मचारी शेख व पालवे हे त्याला ताब्यात घेऊन पोलिस ठाण्यात आणत होते. या दरम्यान, भिंगारनाला परिसरात पाच जणांनी पोलिसांचे वाहन आडवून सादीकला मारहाण केली, अशी फिर्याद सादिकची पत्नी रुक्सार बिराजदारने दिलेली आहे.

पोलिसांनी मात्र सादिकला घेऊन जात असताना त्यानेच चालू वाहनातून उडी मारल्याचा कांगावा केला आहे. पोलिस कर्मचारी शेख यांच्या फिर्यादीवरून सादिकच्या विरोधात गुन्हा देखील दाखल आहे.

पोलिस अधीक्षक मनोज पाटील यांनी या घटनेची गंभीर दखल घेत चौकशीचे आदेश दिले आहेत. चौकशी पूर्ण होताच संबंधित पोलिसांवर कारवाई करण्यात येणार आहे. भिंगार कॅम्प पोलिस घटनेमुळे अडचणीत सापडले.

अहमदनगर लाईव्ह 24

Published by
अहमदनगर लाईव्ह 24