ताज्या बातम्या

डीजेमुळे मुलाच्या वरातीऐवजी निघाली पित्याची अंत्ययात्रा !

Published by
Ahmednagarlive24 Office

Marathi News : डीजेचा दणदणाट वरपित्याच्या जीवावर बेतल्याची घटना पंढरपूरमध्ये सोमवार, १ जानेवारी रोजी रात्री ९ वाजण्याच्या सुमारास घडली. मुलाच्या हळदीच्या वरातीत वरपिता सहभागी झाले होते. मात्र डीजेच्या कर्णकर्कश आवाजामुळे वरपिता हे जागेवरच कोसळले.

त्यांना तातडीने खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आले. मात्र त्यांचा उपचाराआधीच मृत्यू झाला. त्यामुळे भरलेल्या लग्नमंडपात शोककळा पसरली आणि जेथून पारण्याची वरात निघायची तेथून वरपित्याची अंत्ययात्रा निघाली. पंढरपूर शहरात घडलेल्या या दुर्दैवी घटनेत सुभाष देवमारे (५८) यांचा मृत्यू झाला आहे.

पंढरपूर येथील सुभाष देवमारे यांच्या मुलगा अमित देवमारे या तरुणाचा मंगळवार, २ जानेवारी रोजी दुपारी लग्न सोहळा आयोजित करण्यात आला होता. डीजेच्या दणदणाटामध्ये नरदेवाची हळदीची वरात सोमवारी रात्री काढण्यात आली.

भक्ती मार्ग येथील घरापासून काढण्यात आलेली नवरदेवाची हळदीची वरात पंढपूरमधील छत्रपती शिवाजी महाराज चौक, चौफाळा व पुढे काळा मारुती मंदिरासमोर आल्यानंतर डीजेचा आवाज मोठ्या प्रमाणात होता.

त्या कर्णकर्कश आवाजामुळे रात्री ८.४५ वाजता वरपिता सुभाष देवमारे हे जागेवरच कोसळले. त्यामुळे एकच खळबळ उडाली. नातेवाईकांमध्ये घबराट पसरली. सुभाष देवमारे यांना नातेवाईकांनी तातडीने खासगी रुग्णालयात उपचारासाठी दाखल केले. मात्र उपचाराआधीच सुभाष देवमारे यांचा मृत्यू झाला. डीजेचा कर्कश आवाज आणि दणदणाटामुळे वरपिता देवमारे यांचा मृत्यू झाल्याची चर्चा सुरू आहे.

Ahmednagarlive24 Office