अहमदनगर Live24 टीम, 9 मे 2021 :- जिल्ह्यात कोरोनाचा प्रादुर्भाव वाढला असल्याने अनेक ठिकाणी वैद्यकीय सेवांचा अभाव निर्माण होतो आहे. यातच बेड, ऑक्सिजन, व्हेंटिलेटर मिळत नसल्याने अनेकांचा मृत्यू झाला आहे.
दरम्यान जिल्ह्यातील राहुरीत तयार एक अजबच प्रकार पाहायला मिळतो आहे. राहुरी तालुक्यातील वांबोरी येथे ग्रामीण रुग्णालयामधील ऑक्सीजन बेड राहुरीला पळविल्यामुळे वांबोरीतील रुग्णांचे अतोनात हाल होत आहेत.
तसेच या ठिकाणचे कोव्हिड सेंटर निव्वळ क्वारंटाईन सेंटर बनल्याचा आरोप करीत त्याचा ठपका सामाजिक कार्यकर्ते व व्यापारी संजय मुथा यांनी नामदार प्राजक्त तनपुरे यांच्यावर ठेवला आहे. वांबोरी येथे गेल्या काही दिवसांपूर्वी कोव्हीड सेंटर उभारण्यात आले.
या रुग्णालयामध्ये करोनाग्रस्त रुग्णांना औषधोपचार केले जातात. याठिकाणी 20 बेडला ऑक्सिजन सुविधा असून 10 बेड सर्वसाधारण आहेत. एकूण तीस बेडची व्यवस्था केली आहे. परंतु याठिकाणची 20 बेडची सेवा बंद करून ती राहुरीला हलविण्यात आली.
ना. तनपुरे यांनी ही ऑक्सिजन सेवा याठिकाणी सुरू ठेवून राहुरीला तालुक्याच्या ठिकाणी नवीन सुविधा उपलब्ध करण्याची गरज होती. तसे न करता वांबोरी ग्रामीण रुग्णालयातील ऑक्सिजन सेवा बंद केल्याने अनेक रुग्णांना या ऑक्सिजन सेवेअभावी वेगवेगळ्या ठिकाणी धावपळ करावी लागते आहे.