मान्सूनने हजेरी लावल्याने शेतकरी शेती कामांत गुंतला…

Published by
अहमदनगर लाईव्ह 24

अहमदनगर Live24 टीम, 10 जून 2021 :- मान्सूनचे आगमन झालं असून गेल्या काही दिवसांपासून राज्यात पावसाने जोरदार हजेरी लावली आहे. त्याचबरोबर नगर जिल्ह्यातही पावसाने हजेरी लावण्यास सुरुवात केली आहे.

नुकतेच झालेल्या या पावसामुळे बळीराजा सुखावला असून आता शेतकऱ्यांनी शेतातील कामे सुरु केली आहे. कोकण, मध्य महाराष्ट्र आणि मराठवाड्याच्या काही भागांमध्ये मान्सूनचं आगमन झालेलं आहे.

अनेक ठिकाणी सध्या जोरदार पाऊस पडत आहे. तसेच पुढचे चारही दिवस या अनेक ठिकाणी भागात मुसळधार पावसाची शक्यता वर्तवण्यात येत आहे.

यातच नगर जिल्ह्याच्या विविध भागात पावसाचे आगमन झाल्याने बळीराजा सुखावला आहे. पावसाचे योग्य वेळेवर आगमन झाल्यामुळे खरीपाच्या तयारीला वेग आला असून शेतकरी वर्गाने भात पेरणीच्या कामांना वेग घेतला आहे.

श्रीरामपूर, राहाता, अकोले, संगमनेर, नगरसह अन्य तालुक्यांमध्ये मान्सून हजेरी लावत आहे. खरीप हंगामामध्ये सोयाबीन पिकाची पेरणी करताना शेतकर्‍यांनी काळजी घेणे आवश्यक आहे.

कृषी विद्यापीठाच्या निर्देशानुसार बियाणे उगवणीसाठी जमिनीमध्ये पुरेसा ओलावा असणे गरजेचे आहे. त्यासाठी सरासरी 80 ते 100 मि.मी. पाऊस पडणे आवश्यक आहे. जो पर्यंत 80 ते 100 मि.मी पाऊस होत नाही तोपर्यंत सोयाबीन पेरणी करु नका, असं आवाहन कृषी विभागानं केलं आहे.

अहमदनगर लाईव्ह 24