अहमदनगर Live24 टीम, 14 सप्टेंबर 2021 :- पारनेरच्या तहसिलदार ज्योती देवरे यांची अखेर जळगावला बदली करण्यात आली. देवरे यांनी महिला आयोग आणि नाशिकच्या महसूल आयुक्तांकडे केलेल्या तक्रारीत तथ्य आढळून येत नसल्याचा अहवाल समितीने दिला.
देवरे यांच्याविरुद्ध करण्यात आलेल्या तक्रारींत तथ्य आढळून आल्याने त्यांची बदली करण्यात आल्याचा आदेश काढण्यात आला. त्यांना १४ सप्टेंबरपासून एकतर्फी कार्यमुक्त करण्यात येत असून तातडीने नव्या ठिकाणी पदभार स्वीकारण्याचा आदेश देण्यात आला आहे. गेल्या महिन्यात देवरे यांची ऑडिओ क्लिप व्हायरल झाली होती.
राष्ट्रवादीचे आमदार नीलेश लंके यांच्याकडून त्रास दिला जात असल्याचा उल्लेख त्यामध्ये होता. यावरून राज्यभर चर्चा झाली. या प्रकाराला पुढे राजकीय स्वरूपही मिळाले. महिला आयोगाकडे केलेल्या तक्रारीची दखल घेऊन चौकशीचा आदेश देण्यात आला. त्यासाठी महिला अधिकाऱ्यांची समिती नियुक्त करण्यात आली.
तर दुसरीकडे देवरे यांच्याविरुद्ध काही ग्रामस्थांनी केलेल्या तक्रारींचीही चौकशी झाली. देवरे यांच्याविरुद्धच्या चौकशीचा अहवाल पूर्वीच आला आहे. त्यामध्ये देवरे यांच्यावर कर्तव्यात कसूर केल्याचा, पदाचा गैरवापर केल्याचा ठपका ठेवण्यात आला आहे.
तर महिला आयोगाच्या आदेशानुसार करण्यात आलेल्या चौकशीचा अहवालही आता प्राप्त झाला असून देवरे यांनी केलेल्या तक्रारीत तथ्य आढळून येत नसल्याचे त्यात म्हटले आहे. डॉ. माधव वीर यांनी सरकारच्या वतीने देवरे यांच्या बदलीचा आदेश काढला आहे.
देवरे यांची पारनेरहून जळगाव जिल्ह्यात अकार्यकारी पदावर बदली करण्यात आली आहे. त्यांनी केलेल्या तक्रारीत तथ्य आढळून आलेले नाही. मात्र, त्यांच्याविरुद्धच्या तक्रारीत तथ्य आढळून आल्याने त्यांची बदली करण्यात येत आहे.
हा आदेशच त्यांचा कार्यमुक्ती आदेश समजावा, असेही त्यात नमूद करण्यात आले आहे. त्यांच्या जागी पारनेरला अद्याप कोणाचीही नियुक्ती करण्यात आलेली नाही.