अहमदनगर Live24 टीम, 22 जुलै 2021 :- तीन दिवसांपासून सुरू असलेल्या मुसळधार पावसामुळे भंडारदरा धरण 50 टक्के भरले आहे. कालपासून पावसाचा जोर ओसरला असला, तरी संततधार पाऊस सुरू असल्याने धरणामध्ये पाण्याची आवक सुरू आहे.
गेल्या तीन दिवसांत झालेल्या जोरदार पावसाने मोठय़ा प्रमाणात धरणात पाणी दाखल झाले असून, पाणीसाठा 50 टक्के झाला आहे. सध्या विद्युतनिर्मितीसाठी धरणातून 850 क्युसेक पाणी सोडले जात आहे.
भंडारदरा आणि मुळा खोऱ्य़ात हा पाऊस झाल्याने सर्व ओढे-नाले मोठय़ा प्रमाणात वाहून मुळा व प्रवरा नदीला मिळत असल्याने दोन्ही धरणांत पाण्याची आवक वाढत आहे. भंडारदारा पाणलोटक्षेत्रातील घाटघर, पांजरे, उडदावणे,
साम्रद या परिसरातही गेल्या तीन दिवसांपासून पावसाचा जोर होता. दरम्यान, पावसाचा जोर ओसरूनही संततधार सुरू असल्याने पाण्याची आवक वाढत आहे. कळसूबाई शिखर परिसर, तसेच जहागीरदारवाडी,
बारी परिसरात पावसाचा जोर कमी असल्याने कळसूबाईवरून येणारी कृष्णावंती नदी मोठय़ा प्रमाणात प्रवाही नाही. त्यामुळे कृष्णावंतीवरील वाकी बंधारा अद्यापि भरलेला नाही. त्यामुळे निळवंडे धरणात अजून नवीन पाण्याची आवक झालेली नाही.
तर, भंडारदरा धरणातून विद्युतनिर्मितीसाठी सोडले जात असलेले पाणी निळवंडे धरणात दाखल होत आहे. मुळा धरण पाण्याचा साठा ११ हजार ३८६ दशलक्ष घनफूट झाला आहे. धरणाकडे १० हजार ३४२ क्युसेकने पाण्याची आवक सुरू आहे.
मुळा धरण ११३८६ म्हणजे ४४ टक्के भरले आहे. मुळा धरणाच्या पाणलोट क्षेत्रावर पावसाने हजेरी लावली आहे. गुरुवारी दिवसभर पाणलोट क्षेत्रावर ढगाळ वातावरण होते. अधूनमधून पावसाच्या सरी पडत होत्या.
गेल्या काही दिवसांपासून मुळा धरणाच्या पाणलोट क्षेत्रात पावसाने हजेरी लावली आहे. पाणलोट क्षेत्राबरोबरच लाभ क्षेत्रावरही पावसाने हजेरी लावली आहे. त्यामुळे खरिपाच्या पिकांना दिलासा मिळाला आहे.
‘मुळा धरणाच्या पाणलोट क्षेत्रावर रिमझिम पाऊस सुरू आहे. ढगाळ वातावरण असून, मुळा धरण 44 टक्के भरले आहे. कोतुळ येथे दहा मिलिमीटर पावसाची नोंद झाली आहे’.