अहमदनगर Live24 टीम, 29 मार्च 2021:- पाथर्डी तालुक्यातील श्री क्षेत्र मढी येथे गोपाळ समाजाची मानाची होळी रविवारी ५ वाजता पोलीस बंदोबस्तात पेटली.
दत्त मंदिराजवळील होळी पेटविण्याची मूळ जागा बदलून गोपाळ समाजाच्या पारावर होळी घ्यावी, अशा काहींच्या अट्टाहासामुळे किरकोळ तणाव झाला होता.
मात्र कान्होबा देवस्थान समिती, पोलीस, महसूल प्रशासन अशा तिहेरी समन्वयाने होळीने अखेर पेट घेतला दरम्यान काहींच्या किरकोळ हट्टामुळे तणाव निर्माण झाला होता
मात्र तहसीलदार श्याम वाडकर, पोलीस निरीक्षक रणजित डेरे यांनी याबाबत आक्रमक पवित्रा घेतल्याने तणाव निवळला.
त्यानंतर मुख्य मानकरी माणिकराव लोणारे, हरिदास काळापहाड, हरिभाऊ हंबीरराव, नामदेव माळी, पुंडलिक नवघरे, सुंदर गिऱ्हे, रघुनाथ काळापहाड आदींना कडे करून पोलीस बंदोबस्तात कानिफनाथ गडावर नेण्यात आले.
देवस्थानचे अध्यक्ष संजय मरकड, कोषाध्यक्ष राधाकिसन मरकड व विश्वस्थांच्या हस्ते मानकऱ्यांना गोवऱ्या देऊन त्यांना सन्मानित करण्यात आले.
५ वाजता देवस्थान समितीने दिलेल्या व भाविकांनी आणलेल्या गोवऱ्या रचण्यात आल्या. विधिवत अग्निपूजा, महाआरती करून कानिफनाथांच्या जयघोषात होळी पेटविण्यात आली.