अहमदनगर Live24 टीम, 4 मे 2021 :-कोरोना या महामारीच्या काळात आजार झाल्यावर एकीकडे कुटुंबातील व्यक्ती एकमेकांना विचारत नसताना दुसरीकडे मात्र माणुसकीचे अनोखे दर्शन घडविणारी घटना शेवगांव शहरात घडली आहे.
दोन दिवसांपूर्वी शहरातील खाजगी रुग्णालयामध्ये शिक्षक दाम्पत्य असलेल्या परिवारातील वृद्ध आजींचा कोरोनामुळे मृत्यू झाला.
यावेळी त्यांचा मुलगा आणि सुन दोघेही कोरोना पॉझिटिव्ह असल्याने व त्यांच्यावर उपचार सुरु असल्याने आणि जवळच्या नातेवाईकांनी कोरोनाच्या भीतीने पाठ फिरवल्याने त्या वृद्ध महिलेचा अंत्यविधी कोणी करायचा हा प्रश्न उभा राहीला होता.
त्यांची सतरा वर्षांची नात एकटी धावपळ करत असताना सामाजिक कार्यकर्ते समीरभाई शेख यांनी कुठलाही विचार न करता मृत महिलेचे सर्व अंत्यसंस्कार विधी, अग्नी देणे, राख सावडणे आदी कर्म केले. विशेष म्हणजे त्यांचे कडक रोजाचे उपवास सुरु असताना सुध्दा त्यांनी हे कार्य पार पाडले.
सामाजिक जाणीवेतून अडचणीत सापडलेल्या कुटुंबाला आधार देण्याचे काम श्री.शेख यांनी केले असून याचा कुठलाही गाजा वाजा न करता हिंदु मुस्लिम ऐक्याचे दर्शन घडवले. स्व.मारूरतराव घुले पाटील कोव्हीड सेंटरवरही ते निरपेक्ष हेतुने मदत करत असतात.
या कार्याबद्दल राष्ट्रवादीचे नेते माजी आ.चंद्रशेखर घुले, पंचायत समितीचे सभापती डॉ. क्षितिज घुले आणि लोकनेते मारुतराव घुले पाटील ज्ञानेश्वर सहकारी साखर कारखान्याचे चेअरमन नरेंद्र घुले यांनी समीर शेख यांचे अभिनंदन केले.