Ahmednagar News : नगर जिल्हा पोलीस प्रशासनातील स्थानिक गुन्हे शाखेतील भ्रष्टाचाराविरोधात खा. नीलेश लंके यांनी सोमवारपासून पोलीस अधिक्षक कार्यालयापुढे सुरू केलेल्या उपोषणादरम्यान सामान्य नागरिकांडून पोलिसांविरोधात करण्यात आलेल्या तक्रारींचा अक्षरशः धो धो पाऊस पडला. दरम्यान, दिनेश आहेर यांची बदली तसेच अवैध व्यवसाय बंंद झाल्याशिवाय माघार नाही अशी भूमिका खा. लंके यांनी माध्यमांशी बोलताना मांडली.
तक्रारदारांच्या तक्रारी ऐकल्यानंतर माध्यमांशी बोलताना खा. लंके म्हणाले, आमच्याकडे आज लेखी स्वरूपात मोठया प्रमाणावर तक्रारी प्राप्त झालेल्या आहेत. नगर जिल्यात मोठया प्रमाणात अवैध धंदे वाढलेले आहेत. हप्तेखोरी चालू आहे. गुटख्याच्या गाडया सर्रास सोडल्या जातात. अनेक ट्रकचालकांना लुटले जाते. श्रीगोंदे तालुक्यात भोसले नामक पोलीस अधिकाऱ्याने मुस्लिम समाजाच्या घरात जाऊन गायीचा गोठा बंद करून त्यांची उपजिविका बंद केली.
पोलीसांची धटींगशाही सुरू आहे. तक्रारी घेतल्या जात नाही. पोलीस अधिकारी, कर्मचारी पैसे गोळा करण्यात मश्गुल आहेत. मी ज्यावेळी लोकसभेची उमेदवारी केली त्यावेळी माझ्या फोन नंबरचे कॉल रेकॉर्डींग काढले. ही धक्कादायक माहीती उजेडात आली त्यावेळी पोलीस अधिक्षक तसेच गुन्हे शाखेची चलाखी उजेडात आली. पोलीस निरीक्षक दिनेश आहेर यांची तात्काळ बदली करावी त्यांच्याकडील अतिरिक्त कराभार काढून घेण्यात यावा, ही प्रमुख मागणी आहे. जोपर्यंत अवैध व्यवसाय बंद करण्यासंदर्भात ठोस निर्णय होत नाही तोपर्यंत हे आंदोलन सुरूच राहिल असा इशारा खा. लंके यांनी यावेळी दिला.
यावेळी अभिषेक कळमकर, विक्रम राठोड, किरण काळे, दिलीप सातपुते, भगवान फुलसौंदर, प्रकाश पोटे, बाबाजी तरटे, सुदाम पवार, सुवर्णा धाडगे, अॅड. राहुल झावरे, बाळासाहेब खिलारी, अभयसिंह नांगरे, चंद्रभान ठुबे, प्रा. संजय लाकूडझोडे, ज्ञानदेव लंके यांच्यासह अनेक कार्यकर्ते, तक्रारदार यावेळी उपस्थित होते.
आंदोलन दडपण्याचा प्रयत्न होऊ शकतो
हे आंदोलन दडपण्यासाठी साध्या वेशातील पोलीस कर्मचारी आंदोलनात सहभागी होऊन वाईट कृत्य केले जाउ शकते. पोलीस बळाचा वापर करू शकतात. त्यातून खोटे गुन्हे दाखल करण्याचाही प्रयत्न होईल त्यामुळे संपूर्ण आंदोलनादरम्यान माध्यम प्रतिनिधी तसेच कार्यकर्त्यांनी व्हिडीओ रेकॉडींग करण्याचे आवाहन खा. नीलेश लंके यांनी यावेळी केला.
सुवर्णकारांना जाच
एका गुन्हयातील मुद्देमाल दहावेळा वसुल केला जातो. सुवर्णकारांना अनधिकृत लॉक अप मध्ये बसवून दहशत निर्माण केली जाते. पोलीस लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या अधिकाऱ्यांचेही कॉल ट्रॅकिंग करतात. त्यामुळे या विभागाकडे तक्रार करूनही उपयोग होत नाही. अशा पोलीस अधिकारी व कर्मचाऱ्यांवर मोक्कांतर्गत कारवाई झाली पाहिजे. अनिल राठोड यांच्यानंतर खा. नीलेश लंके यांनी सुवर्णकार बांधवांवर होणाऱ्या अन्यायाविरोधात आवाज उठविला आहे. – लाळगे, अध्यक्ष सुवर्णकार संघटना
चोरीच्या सोन्याचा आरोप आणि अडीच लाखांची वसुली
चोरीचे सोने घेतल्याचा खोटा आरोप करून माझ्या पतीला मारहाण करीत पोलीस अधिक्षक कार्यालयात आणण्यात आले. तिथे उपस्थित असलेल्या उपनिरीक्षकाने दालनात जाऊन सेटलमेंट करून घेण्याचा सल्ला दिला. त्यास नकार दिल्याने माझ्या पतीला बेदम मारहाण करण्यात आली. अडीच लाख रूपयांचे सोने आणून दिल्याशिवाय माझ्या पतीची सुटका करण्यात आली नाही. खोटा आरोप लावून माझ्या पतीस मारहाण करण्यात आली. दबाव टाकून आमच्याकडून सोने घेतले त्यासाठी अडीच लाख रूपये व्याजाने घ्यावे लागले. हे पैसे पोलीसांनी व्याजासह परत द्यावेत. अधिकारी आहेर, कर्मचारी कर्डीले यांनी या प्रकरणात त्रास दिला. – प्रियंका गायकवाड, तक्रारदार
अॅड. गर्जे यांनी वाचला कृष्ण कृत्यांचा पाढा
तपास थांबविण्यासाठी महिलेकडे शरीर सुखाची मागणी करणारे कर्मचारी स्थानिक गुन्हे शाखेत आहेत. स्थानिक गुन्हे शाखेच्या कर्मचाऱ्यांनी कोणत्याही पोलीस ठाण्याच्या हद्दीत गेल्यानंतर सबंधित स्टेशन डायरीला नोंद करणे बंधनकारक असते. मात्र तसे न करता खुले आम हप्ते वसुली करण्यात येते. रस्ते आडवून पैसे उकळले जातात. नगर जिल्हयासाठी कोण एसपी हवा याचा ठेका कर्डीले नावाचा कर्मचारी याने घेतला आहे. एस पी आपल्या शब्दापुढे नाही अशी भाषा हा कर्डीले कर्मचारी वापरतो. कोणत्याही पोलीस कार्यालयात सीसीटीव्ही असणे बंधकारक असताना स्थानिक गुन्हे शाखेच्या कार्यालयात मात्र सीसीटीव्ही नाहीत. या शाखेकडून न्यायालयाच्या आदेशाचा भंग करण्यात येत असून त्या विरोधात आपण याचिका दाखल करणार आहोत. या शाखेतील ठरावीक कर्मचा-यांना पिस्टल देण्यात आले असून ते कोणाच्या परवानगीने देण्यात आले याचा खुलासा झाला पाहिजे. हे कर्मचारी हे पिस्टल त्यांच्या घरीही घेऊन जातात. या शाखेचे कर्मचारी कोणाच्याही मोबाईल फोनचे सीडीआर काढतात. राईट टू प्रायव्हसी नुसार असे करता येत नाही. हप्ते वसुल करणारे कर्मचारी सात ते आठ वर्षांपासून एकाच पोलीस ठाण्यात आहेत. – अॅड. हरीहर गर्जे, पाथर्डी