अहमदनगर Live24 टीम, 11 जुलै 2021 :- जरंडेश्वर साखर कारखान्याला केलेल्या कर्जपुरवठ्याची माहिती अंमलबजावणी संचालनालयाने सातारा जिल्हा बँकेला मागितली आहे. या बाबतची नोटीस नुकतीच बँकेला बजावण्यात आली.
यामुळे सहकार बँकिंग क्षेत्रात एकच खळबळ उडाली. दरम्यान या कारखान्याला केलेला कर्जपुरवठा रिझर्व्ह बँक व नाबार्डच्या धोरणानुसारच केलेला असल्याचे बँकेचे मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. राजेंद्र सरकाळे यांनी सांगितले आहे.
मागील आठवड्यात साताऱ्यातील चिमणगाव येथील जरंडेश्वर साखर कारखान्यावर ईडीने जप्तीची कारवाई केल्यानंतर आता या कारखान्याला कर्ज केलेल्या सातारा जिल्हा बँकेलाही ईडीने दोन दिवसांपूर्वी नोटीस बजावली आहे.
यामध्ये केलेला कशासाठी व किती कर्ज पुरवठा केला? त्याची परतफेड नियमित होतेय काय? कर्ज पुरवठा कशाच्या आधारावर केला आहे? आदी माहिती ईडीने मागितली आहे.
त्यामुळे नाबार्डचे सर्वोत्कृष्ट बँकेचे सलग सात पुरस्कार मिळविणाऱ्या बँकेलाच जरंडेश्वर साखर कारखाना प्रकरणी नोटीस आल्याने आश्चर्य व्यक्त होत आहे.
बँकेचे बहुसंख्य संचालक हे राष्ट्रवादी काँग्रेसशी संबंधित आहेत. ज्यावेळी हा कर्जपुरवठा केला तेव्हा आणि आताही आमदार शिवेंद्रसिंहराजे भोसले हे बँकेचे अध्यक्ष आहेत.