आयशर व दुचाकीचा अपघात, दोघांचा मृत्यू

मोफत मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

अहमदनगर Live24 टी म, 23 सप्टेंबर 2021 :- राहुरी शहर हद्दीतील नगर मनमाड राज्य महामार्गावर मुळा नदीवरील पुलाच्या जवळ आयशर टेम्पोने मोटारसायकलला जोराची धडक दिली.

या घटनेत तालूक्यातील दोन तरूण जागेवरच ठार झाल्याची घटना दिनांक २३ सप्टेंबर रोजी सव्वादोन वाजे दरम्यान घडली. घटनेनंतर पसार झालेल्या टेम्पो चालकाला पाठलाग करुन पकडण्यात आले.

या घटने बाबत समजलेली माहिती अशी कि, दिनांक २३ सप्टेंबर रोजी दुपारी सव्वादोन वाजे दरम्यान राहुरी तालुक्यातील दोन तरूण स्प्लेंडर मोटारसायकल क्रमांक एम एच १७ एन ७८९१ हिच्यावर बसून नगर मनमाड रस्त्याने राहुरी कडून राहुरी खुर्द कडे जात होते.

यावेळी पाठीमागून आलेल्या आयशर टेम्पोने मुळा नदीवरील पुला जवळ असलेल्या बगीचा जवळ मोटारसायकलला जोराची धडक दिली. या भिषण अपघातात मोटारसायकलचा चक्काचूर झाला.

तसेच मोटारसायकलवरील दोन तरूणांच्या डोक्याचा चेंदामेंदा होऊन ते जागेवरच ठार झाले. त्या ठिकाणी एक महिलेने मिठाईचे दुकान लावले होते. धडक झाल्यावर मिठाई रस्त्यावर अस्ताव्यस्त पडली होती.

तर महिला बालबाल बचावली. अपघातानंतर आयशर टेम्पो घटना स्थळावरून पसार झाला होता. मात्र राहुरी खुर्द येथील गणेश भांड व रवी आभाळे या दोन तरूणांनी घटनेचे गांभीर्य ओळखून आयशर टेम्पोचा मोटारसायकलवर पाठलाग केला.

नांदगाव परिसरात त्या टेम्पोला पकडून टेम्पो चालकाला घटनास्थळी आणले. घटनास्थळी बघ्यांची मोठी गर्दी झाली होती. यावेळी मद्यधुंद अवस्थेत असलेल्या टेम्पो चालकाची उपस्थित नागरीकांनी यथेच्छ धुलाई करत राहुरी पोलिसांच्या ताब्यात दिले.

या अपघातात ठार झालेल्या तरूणांची नावे विलास भानुदास चव्हाण व गोरख गायकवाड असे असून ते राहुरी तालुक्यातील वरवंडी परिसरातील रहिवाशी असल्याची माहिती समजली आहे. या घटने बाबत राहुरी पोलीसात संध्याकाळी उशिरापर्यंत गुन्हा दाखल करण्याचे काम सुरू होते.