ताज्या बातम्या

एकतर ‘शासनात विलीनीकरण करा नाही तर स्वेच्छा मरणाची परवानगी द्या’..!

Published by
Ahmednagarlive24 Office

अहमदनगर Live24 टीम, 31 डिसेंबर 2021 :- संपातून सर्व एसटी कामगार संघटनांनी माघार घेतल्यानंतर व लवकरात लवकर कामावर रुजू न झाल्यास कठोर कारवाईचा इशारा सरकारने दिला आहे.(st employees)

मात्र आता या कर्मचाऱ्यांनी देखील विलीनीकरणाशिवाय मागे हटणार नसल्याचे सांगत सरकारने एकतर ‘शासनात विलीनीकरण करावे नाही तर स्वेच्छा मरणाची परवानगी द्या’..! अशी मागणी जामखेड येथील संपकरी एसटी कर्मचाऱ्यांनी मुखयमंत्र्यांकडे केली आहे.

सरकारने संपकरी एसटी कर्मचाऱ्यांवर कठोर कारवाईचा इशारा दिल्यानंतरही विलीनीकरणाशिवाय मागे हटणार नसल्याचे संपकऱ्यांनी सांगितले आहे. आर्थिक विवंचनेतून आणि विलीनीकरणाच्या मागणीसाठी आतापर्यंत ६० एसटी कर्मचाऱ्यांचा मृत्यू झाला आहे.

एसटीचे एक लाख कर्मचारी व त्यांच्या मुलांच्या भवितव्यासाठी विलीनीकरणाचा लढा सुरू आहे. त्यामुळे स्वतःच्या कुटुंबीयांचा विचार बाजूला ठेऊन लढ्यात सहभागी झाले असल्याचे कर्मचाऱ्यांनी सांगितले. तसेच, सरकारने जाहीर केलेल्या वेतनवाढीच्या दाव्यावरही कर्मचाऱ्यांनी प्रश्नचिन्ह उपस्थित केले आहेत.

सरकार २५०० रुपये पगार वाढवून ४१ टक्के पगार वाढवल्याचा दावा कसा काय करू शकते, असा सवाल कर्मचाऱ्यांनी केला आहे. १६ वर्षांपासून वेतन करार झाले नसल्याने एसटी कर्मचाऱ्यांचे प्रचंड आर्थिक नुकसान झाले आहे. त्यामुळे अशा वेळी ही वेतनवाढ मुळात फसवी आहे, असे ते म्हणाले.

तसेच, एसटी कर्मचाऱ्यांचा हा संप नसून दुखवटा आहे. अजूनही सरकार आमच्या मागण्यांकडे दुर्लक्ष करून निलंबन, सेवासमाप्ती, बडतर्फीची कारवाई करत आहे.

कारवाईच्या माध्यमातून धमकावत आहे; मात्र आता गोळ्या घातल्या, तरी मागे हटणार नाही, असेही कर्मचारी म्हणाले. तसेच, कारवाईच्या धसक्याने अनेक कर्मचाऱ्यांना हृदयविकाराचा झटका आला आहे.

त्यामुळे एसटी कर्मचाऱ्यांच्या मृत्यूला सरकार जबाबदार आहे. याची नैतिक जबाबदारी स्वीकारून परिवहन मंत्र्यांनी राजीनामा द्यावा, असेही कर्मचाऱ्यांनी सांगितले.

Ahmednagarlive24 Office