एकनाथ खडसेंच्या अडचणी वाढण्याची शक्यता; मंदाताई खडसेंना ईडीचे समन्स

Published by
अहमदनगर लाईव्ह 24

अहमदनगर Live24 टीम, 17 ऑगस्ट 2021 :- पुण्याच्या भोसरी येथील विवादास्पद भूखंड खरेदी प्रकरणी माजी मंत्री एकनाथराव खडसे यांच्या पत्नी व जिल्हा दूध संघाच्या अध्यक्षा मंदाताई खडसे यांना ईडीने चौकशीसाठी समन्स पाठविले आहे.

याआधीही ईडीने समन्स बजावला होता. पण, त्या चौकशीला हजर न राहिल्यामुळे पुन्हा एकदा समन्स बजावले असल्याची माहिती समोर आली आहे. खडसे यांच्या अडचणीत दिवसेंदिवस वाढ होत आहे.

पत्नी मंदाताई खडसे यांना ईडीकडून पुन्हा समन्स बजावण्यात आलं आहे, अशी माहिती विश्वसनीय सूत्रांनी दिली. मंदाताई खडसे यांना भोसरी भूखंड प्रकरणात चौकशीसाठी उद्या 18 ऑगस्ट रोजी ईडी कार्यालयात हजर राहण्यासाठी समन्स बजावण्यात आलं आहे. यामुळे पुन्हा एकदा खडसे कुटुंबाच्या अडचणी वाढण्याची शक्यता आहे.

भोसरी येथील एक भूखंड खरेदी प्रकरणी माजी मंत्री एकनाथराव खडसे यांची दोनदा ईडीने चौकशी केली आहे. दुसर्‍या चौकशीच्या दरम्यान खडसे यांनी पूर्ण सहकार्य करत हव्या त्या वेळेस गरज पडल्यास चौकशीला उपस्थित राहण्याची तयारी दर्शविली आहे. दरम्यान, त्यांचे जावई गिरीश दयाराम चौधरी हे याच प्रकरणात ५ जुलै पासून ईडीच्या अटकेत आहेत.

भोसरी येथील भूखंड हा गिरीश दयाराम चौधरी आणि मंदाताई एकनाथराव खडसे यांनी संयुक्तरित्या खरेदी केला होता. यामुळे मंदाताईंना याआधी ईडीने चौकशीसाठी समन्स बजावले होते.

तेव्हा त्यांनी चौकशीआधी वेळ मागून घेतला होता. ईडीने ही मागणी मान्य केल्याने त्यांची चौकशी ही पुढे ढकलण्यात आली होती. दरम्यान, यानंतर आता ईडीने त्यांना पुन्हा समन्स बजावले असून उद्या दि. १८ ऑगस्ट रोजी ईडीच्या मुंबई येथील कार्यालयात चौकशीसाठी हजर राहण्याचे सांगितले आहे.

अहमदनगर लाईव्ह 24