अहमदनगर Live24 टीम, 18 ऑक्टोबर 2021 :- राज्यातील मुंबई शहर, सोलापूर, कोल्हापूर, धुळे, नंदूरबार, वाशिम, नागपूर आणि नगर जिल्ह्यातील स्थानिक स्वराज्य संस्थेच्या विधान परिषदे जागेची मुदत 1 जानेवारी 2022 संपणार आहे.
त्यापूर्वीच या ठिकाणी निवडणूक घ्यावी लागणार आहे. स्थानिक स्वराज्य संस्था, महापालिका, नगरपालिका आणि नगर परिषद सदस्यांची यादी अंतिम करण्याचे काम सुरू झाले आहे.
दरम्यान विधान परिषद निवडणूक होणार्या जिल्ह्यात स्थानिक स्वराज्य संस्थांचे सदस्य, सभापती आणि नगरसेवकांच्या नजरा इच्छुक उमेदवारांकडे लागल्या आहेत.
नगरमधून विधान परिषदेवर राष्ट्रवादीचे आ.अरुण जगताप यांना दोन वेळा संधी मिळालेली असून डिसेंबरमध्ये होऊ घातलेल्या या निवडणुकीत त्यांना संधी मिळणार की महाविकास आघाडीकरून नवा चेहरा पुढे केला जाणार याकडे सर्वांचे लक्ष आहे.
नगरची जागा राष्ट्रवादीच्या वाट्याला आहे. मात्र राज्यात सध्या महाविकास आघाडीची सत्ता आहे. नव्या सत्तासमिकरणात काही बदल होणार का, याचीही चर्चा आहे.
त्यामुळे ऐनवेळी ही जागा मित्र पक्षाकडे जाणार की राष्ट्रवादी आपला हक्क कायम ठेवणार, याकडे राजकीय वर्तुळाचे लक्ष असेल. जिल्ह्यातील पाच नगर परिषदांची मुदत संपत आली असून या ठिकाणी असणारे नगरसेवकांच्या मतदान पात्रतेचा मुद्दाही अद्याप स्पष्ट नाही.